Recruitment Fraud : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या नावाने थेट बनावट नियुक्तिपत्र, शिपाई भरती घोटाळ्याचा पर्दाफार्श; पोलिसात तक्रार दाखल

Gadchiroli Zilla Parishad Fake Appointment Letter Exposed : गडचिरोली जिल्हा परिषदमधील शाळांमधील शिपाई भरतीची बनावट जाहिरातीचे प्रकरण ताजे असतानाच आता त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
gadchiroli zilla parishad
gadchiroli zilla parishadsarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli News : गडचिरोली जिल्हा परिषद शाळांमधील परिचर (शिपाई) पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला थेट जिल्हा परिषदेच्या नावाने शिपाई पदाचे बनावट नियुक्तिपत्रच देण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकारामुळे जिल्हा परिषदेसह प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिली.

यापूर्वी समाज माध्यमावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदासाठी २२ हजार रुपये मासिक वेतनावर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ खुलासा करून ही जाहिरात पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट केले होते. कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे सांगत नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणाच्या बातमीची शाई वाळत नाही तोच आता एका उमेदवाराला जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि निवड समितीच्या नावाने कंत्राटी शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे समोर आले आहे. या बनावट आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, नियुक्तीच्या अटी व शर्ती तसेच कार्यालयीन पत्राचा संपूर्ण नमुना हुबेहूब वापरण्यात आला आहे.

gadchiroli zilla parishad
Zilla Parishad News: सदस्यांना गुलाल लागून तीन महिने झाले तरी रस्त्यांना डांबर लागेना! विकासनिधींना मुहूर्त मिळेना

एवढेच नव्हे तर संबंधित उमेदवाराला विशिष्ट तारखेला कामावर रुजू होण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या नियुक्तिपत्राची सत्यता नाकारत हा आदेश पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले असून संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रांचे घोटाळे वाढले गडचिरोलीत गेल्या काही दिवसांत बनावट कागदपत्रांचे घोटाळे, गैरप्रकार सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने खनिज निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे (प्रमा) आदेश तयार केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे.

gadchiroli zilla parishad
Zilla Parishad fund dispute: आमदारांची कामे जिल्हा परिषदेच्या निधीतून का? कोल्हापूर झेडपीत नव्या वादाला फुटले तोंड

त्याआधी गडचिरोलीच्या धान घोटाळ्याशी संबंधित बनावट पत्र काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांच्या बनावट स्वाक्षरीचे मंत्रालयात सादर करण्यात आल्याची घटनाही समोर आली होती. आता त्यात बनावट भरती जाहिरात आणि थेट बनावट नियुक्ती आदेशाची भर पडल्याने प्रशासनासोबतच पोलिस यंत्रणेसमोरही बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे मोठे आव्हान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com