
Nagpur, 02 May : महायुती सरकारने जाहीर केलेल्या मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डची चर्चा आता राज्यात रंगू लागली आहे. संबंधित खात्याचे मंत्री खूश असले तरी विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘अपयशी लोकांना पाहिले स्थान देणारा क्रम लावला की काय’ अशी शंका व्यक्त केली. सोबतच रेटिंगमध्ये पहिल्या पाचमध्ये आलेल्या खात्यांची आणि मंत्र्यांच्या कामगिरीचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे.
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. महिलांच्या खात्यांमध्ये थेट प्रतिमहिना १५०० रुपये टाकून त्यांची मते घेतली. प्रचारा दरम्यान एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ केली जाईल, असेही आश्वासन सरकारने दिले होते. हा सर्व उपक्रम महिला व बालविकास खात्यांमार्फत राबवण्यात आला होता.
निवडणूक जिंकताच महायुती सरकारने (Mahayuti Government) लाभार्थी महिलांची नावे योजनेतून कमी करणे सुरू केले आहे. लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. आता तर पंधराशे रुपयेसुद्धा देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना पाचशे रुपयेच मिळतील, असेही जाहीर केले आहे. महिलांची किती सहजपणे दिशाभूल करता येऊ शकते, या कामगिरीसाठी महिला व बाल विकास विभागाला सर्वाधिक रेटिंग देण्यात आले असावे, असा टोला बाळासाहेब थोरातांनी सरकारला लगावला आहे.
थोरात म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागास जागोजागी रस्त्यावर असलेले खड्डे आणि प्रत्येक गचक्यामागे सरकारची आठवण येत राहावी, या कामगिरीसाठी दुसरा क्रमांक देण्यात आला असवा. पिकविमा योजन बंद केली आणि शेतकऱ्यांना लग्न बारश्यासाठी कर्जमाफी हवी असल्याचे धाडसी वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना व त्यांच्या खात्याला तिसरा क्रमांक दिला असावा.
नीतेश राणे यांचे महान कार्य राज्यात सुरू आहे. दोन समाजात भेद कसा निर्माण करता येईल, हा एकमेव कार्यक्रम राबवत असल्याने महायुती सरकारने त्यांच्या मत्स्य व बंदरे विभागाला पाचवे स्थान देऊन खुश केले. परिवहन विभागाचा कारभार फारच मस्त सुरू आहे. जागोजागी रस्त्यावर बंद पडलेल्या एसटी बसेस दिसत आहे. ज्या बसेस धावत आहे त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल ५४ टक्के कपात करण्याचा आदेश काढण्यात आला होता, अशी टीका परिवहन विभागावर थोरातांनी केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आधार नसलेल्यांना दिले जाते. मात्र चार महिन्यांपासून त्यांना पैसे गेले नाही. निराधार लोकांची काळजी घेऊ शकत नाही, त्या सरकाराला कुचकामीच म्हणावे लागेल, अशी टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली. मंत्रिमंडळाचे जे वातावरण आहे, त्याचासुद्धा परिणाम यावर निकालावर दिसत आहे. सामान्य प्रशासन विभागाची खराब कामगिरी दाखवण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस खरे बोलले, असाही टोला थोरात यांनी युती सरकारला लगावला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.