

Chandrapur Election : किशोर जोरगेवार यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकाळात, त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच नगर पालिकेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारीपदही पक्षाने त्यांच्याकडे दिले आहे. पण त्यामुळे पहिलीच निवडणूक असलेल्या घुग्घुस नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जोरगेवारांची खरी कसोटी लागणार आहे.
यंग चांदा ब्रिगेडचे संयोजक असलेल्या किशोर जोरगेवारांना २०१९ च्या चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून भरघोस मतांनी विजय मिळाला. त्याकाळात यंग चांदा ब्रिगेडचे संघटनात्मक जाळे शहरभर पसरले होते. त्यामुळे त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारीही सुरू केली होती.
मात्र, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेल्याने निवडणुका रखडल्या. दरम्यान, २ जानेवारी २०२१ रोजी घुग्घुस नगर परिषदेची स्थापना झाली. चंद्रपूर महानगरपालिकेवर २९ एप्रिल २०२२ रोजी प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच त्यांच्या सोबत असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश मिळविण्याची संधी गमवावी लागली.
२०२४ च्या निवडणुकीत जोरगेवार भाजपात (BJP) दाखल झाले आणि पुन्हा निवडून आले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. पक्षाने जोरगेवारांना चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी बनवले आहे. सध्या जिल्ह्यात १० नगर पालिका आणि एक नगर पंचायत यांचे निवडणुकीचे वातावरण आहे, त्यातीलच घुग्घुस एक.
२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घुग्घुस शहरात काँग्रेसला आघाडी मिळाली होती. घुग्घुस शहर हे राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे यांचे एकेकाळचे कार्यक्षेत्र. भोंगळे हे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या गटातील. काँग्रेसला थेट टक्कर देण्यासाठी राजकीय शहाणपण दाखवत जोरगेवारांनी भोंगळे यांना विश्वासात घेतले आणि तिकीट वाटपात त्यांना प्राधान्यही दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या ‘परीक्षेत’ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी जोरगेवार प्रयत्नरत आहेत. पण घुग्घुस नगर पालिकेत अपयश आले, तर महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी असतानाही त्यांच्या शब्दाला अपेक्षित धार राहणार नाही याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.
घुग्घुस नगरपालिकेत आमदार देवराव भोंगळे आणि त्यांच्या समर्थकांना विश्वासात घेऊन जोरगेवार यांनी तिकीट वाटप केले. त्यामुळे अपवाद वगळता वाद निर्माण झाला नाही. पण चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपादरम्यान जोरगेवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
आजवर महानगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपात आमदार सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांची भूमिका महत्त्वाची असायची. आता त्यात स्थानिक आमदार म्हणून जोरगेवारांची भर पडली आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचे सख्य सर्वश्रुत आहे. एकेकाळची गुरु-शिष्याची जोडी आता एकमेकांचे तोंडही बघत नाही.
जोरगेवारांसमोर खरी अडचण भाजपात विलीन करण्यात आलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आहे. अपक्ष आमदार असताना प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. आता त्याच प्रभागांमध्ये भाजपचे पदाधिकारी, यंग चांदा ब्रिगेडचे माजी पदाधिकारी आणि जोरगेवार समर्थक यांच्यात तिकीट मिळविण्यावरून चांगलीच रस्सीखेच होणार आहे.
घुग्घुस येथे भाजपने नगराध्यक्ष पदासाठी पूजा दुर्गम यांची निवड केली आहे. तर, काँग्रेसने दीप्ती सोनटक्के यांना मैदानात उतरविले आहे. शिवसेना उबाठाच्या शोभा ठाकरे यांनीही नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले होते. पण छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. यामुळे आता भाजपच्या पूजा दुर्गम आणि काँग्रेसच्या दीप्ती सोनटक्के यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.