Congress Politics : विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी केले होते. तसेच त्यांनी कारवाईच्या इशाराही दिला होता. त्यानुसार काही बंडखोरांना निलंबितसुद्धा करण्यात आले आहे. असे असले तरी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि जिल्ह्याचे नेते तसेच माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसला उघड चॅलेंज दिले आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला आहे. येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. असे असले तरी त्यांच्या प्रचारसभेत खासदार बर्वे आणि सुनील केदार सहभागी झाले. त्यांनी उघडपणे मुळकांना निवडूण देण्याचे आवाहन केले.त्यामुळे आता काँग्रेस या दोन्ही नेत्यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात सोमवारी सकाळी मुळक यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी या सभेला उपस्थिती लावल्याने उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी थेट केदार यांच्यावर तोफ डागली होती. छत्रपतींसमोर उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द केदारांनी पाळला नाही. गद्दारी केली, असा आरोपही त्यांनी केला होता.
रामटेक मतदारसंघ मिळवण्यासाठी काँग्रेसने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तो सोडण्यास नकार दिला होता. विशाल बरबटे यांना येथून उद्धव सेनेने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्यावतीने आमदार आशिष जयस्वाल लढत आहे. काँग्रेसच्या मुळकांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार बर्वे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुळकांसोबत होते. मुळकांच्या बंडखोरीमुळे रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.