

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप युती करणार की नाही, युती झाल्यास किती जागा सोडल्या जातील याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. भाजपकडे असलेली गर्दी लक्षात घेता एकही जागा सोडण्याचा मनःस्थितीत भाजपवाले नाहीत. काही नेते खासगीत तसे दावेसुद्धा करीत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने 15 टक्के जागेची मागणी केली आहे.
जागेचा प्रस्ताव नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे युतीची तुम्ही चिंता करू नका, स्थानिक नेते काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला पक्षाचे निरीक्षक, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना दिला. युतीचा निर्णय नागपूरमध्ये नाही तर मुंबईत होणार असल्याचेही जैन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कोअर समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महायुतीत 15 टक्के जागा मागण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे जैन यांनी सांगितले. यानुसार जवळपास 22 ते 23 जागा महायुती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी भाजपला सोडाव्या लागणार आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश महासचिव तानाजी वनवे आणि प्रदेश सचिव आभा पांडे, राजेश माटे हे तीन माजी नगरसेवक आहेत.
आभा पांडे या गेल्या निवडणुकीत अपक्ष तर तानाजी वनवे काँग्रेसकडून (Congress) निवडून आले होते. राजेश माटे पंधरा वर्षांपूर्वी नगरसेवक होते. हे बघता पाचपेक्षा अधिक जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. दीडशे जागेसाठी सुमारे तीन हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते भाजपमध्ये इच्छुक आहे. इच्छुकांची संख्या बघून मुलाखतीसाठी भाजपला वेळ अपुरा पडत आहे. एका दिवसात दोन विधानसभा मतदारसंघाच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आधी भाजपने जाहीर केला होता. इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे तो दोन दिवस करण्यात आला आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी भाजपचे 130 चे टार्गेट ठेवले आहे. त्याकरिता दीडशे जागा लढवणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. राष्ट्रवादीसोबत महायुती झाल्यास शिवसेनेसाठीसुद्धा जागा सोडाव्या लागणार आहे. अशा परिस्थितीत महायुती झाली तर भाजपलाच सर्वाधिक बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो. हे बघता महापालिकेत युती होण्याची कुठलीच शक्यता सध्या दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.