
Nagpur News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीबाबत मोठी अस्वस्थता आहे. महायुती होणार नाही असेच सध्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकेतवरून तसा अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे उद्धव सेना आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे सेनेच्या अस्वस्थतेत आणखीच भर पडली आहे. हे बघून विदर्भातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीकता वाढत चालली आहे. त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत कोर्टाचा निकाल येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा शिवसेनेच्या बैठकीचा अजेंडा असे सांगण्यात आले असले तरी काही ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला दाखल होण्यास सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे आदेश धडकताच अनेक जण विदर्भातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. शुक्रवारी मंत्री दादा भुसे यांच्या मुंबईतील जंजिरा बंगल्यावर विदर्भातील सर्व जिल्ह्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याची बैठक एकत्रित लावण्यात आली आहे. त्यानंतर वर्धा आणि चंद्रपूर, नागपूर-रामटेक, अकोला- अमरावती, वाशिम-यवतमाळ तर बुलढण्याची बैठक सर्वात शेवटी दुपारी चार वाजता होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही बैठक बोलावण्यात आली असून यात शिवसेना नेते रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, खासदार श्रीकांत शिंदे आणि मीनाताई कांबळी या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यवतमाळचे आमदार संजय राठोड आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल मंत्रिमंडळात आहेत. भंडारा आणि बुलडाण्यातून शिवेसनेचे आमदार आहेत. माजी कृपाल तुमाने आणि माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे. असे असले तरी शिवसेनेची एकत्रित ताकद विदर्भात दिसत नाही.
विदर्भात भाजपचे वर्चस्व आहे. स्थानिक निवडणुकीत महायुती झाली तरी ते फारशा शिवसेनेसाठी सोडणार नाहीत. स्वबळावर लढायची वेळ आल्यास आपली ताकद शिवसेनेला दाखवावी लागणार आहे. महायुती होणार नाही आणि आपल्याला दुय्यम स्थान दिले जाणार असल्याचे दिसत असल्याने शुक्रवारी तातडीने बैठक बोलावण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी नागपूरमध्ये ही बैठक घेण्यात येणार होती. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ती पुढे ढकलावी लागली. आता वेळ कमी असल्याने सर्वांना एकाच दिवशी मुंबईत बोलावून बैठक घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.