
Mumbai News : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. या निवडणुकीची लगबग सर्वच राजकीय पक्षातून दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेच्या युतीची बोलणी सुरु आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज-उद्धव ठाकरेंच्या गेल्या तीन महिन्यात आतापर्यंत सहावेळा भेटीगाठी झाल्या आहेत.
ठाकरे बंधूंच्या सातव्या भेटीचा ही मुहूर्त दिवाळीआधीच ठरला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षात चर्चा सुरु आहे. त्यातच आता ठाकरे बंधूंच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा'चा आणखी एक अध्याय पुढे आला असून मनसेच्या दीपोत्सवाचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर त्यांच्या नावाचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे संकेत ठाकरे बंधूनी दिले आहेत. मनसे व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना नेत्याची युतीबाबत बोलणी सुरु आहे. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत राज-उद्धव ठाकरे हे बंधू जवळपास सहावेळा भेटले आहेत. त्यामुळे त्यांच्या युतीबाबत शिवसैनिकांत व मनसैनिकांत उत्सुकता कायम आहे.
त्यातच आता या दोन्ही बंधुतील सातव्या भेटीचा मुहूर्त देखील ठरला आहे. दिवाळी पूर्वी मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम होतो. या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.30 वाजता केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) हेदेखील उपस्थित असतील. म्हणजेच दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमात दोघेही भाषण करण्याचीही शक्यता आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करीत पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना डिवचले आहे. यापूर्वी ही ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देताना त्यांच्या नावाचा उल्लेख आमचे मोठे बंधू व शिवसेना पक्षप्रमुख असा केला होता. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले जाण्याची शक्यता आहे.
याआधी 2022 साली मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता त्यांचीच जागा यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मनसेच्या या दीपोत्सवात वेगवेगळे कलाकारदेखील उपस्थित असतात, असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
'ब्रँड ठाकरे'ची ताकद पुन्हा दिसणार
मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या दोन्ही पक्षांचा पाया 'मराठी' आणि 'हिंदुत्वा'च्या मुद्यावर आधारित आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्षाची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून स्थानिक कामांमध्ये 'मनसे'चा पुढाकार आणि 'शिवसेने'चे समर्थन हे एकत्र आल्यास 'ठाकरे ब्रँड'ची ताकद पुन्हा एकदा मराठी मतदारांमध्ये रुजविण्याचा हा प्रयत्न आहे.
येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही हे अजून निश्चित नसले तरी, स्थानिक पातळीवरील कार्यक्रमातून दोन्ही ठाकरे गटांमध्ये राजकीय सलोखा वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही पक्षाची युती होईल, असे स्पष्ट संकेत आहेत.
राज-उद्धव ठाकरे तीन महिन्यात सहावेळा भेटले
हिंदी सक्तीच्या विरोधातील जीआर रद्द केल्यानंतर 5 जुलै रोजी पहिल्यांदा राज व उद्धव ठाकरे वरळीतील डोममध्ये एकत्र येत मेळावा घेतला होता. त्यानंतर 27 जुलैला मातोश्री या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर गणेश उत्सव काळात 26 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतरही मधल्या काळात युतीबाबत राज-उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मातोश्री निवासस्थानी चर्चा झाली होती.
त्यानंतर 12 ऑक्टोबरला राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही भावामध्ये जवळपास तीन तास सविस्तर चर्चा झाली होती. या दोन भावातील या वाढलेल्या भेटीगाठीमुळे सध्या मनसे आणि ठाकरे गट येत्या काळात एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सलग सहा वेळा भेट झाली आहे.
सलग दोन दिवस ठाकरे बंधू एकत्र
14 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात अशा बड्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी या सर्व नेत्यांनी मतदार यादीतील विसंगतींवर अनेक प्रश्न विचारले होते. या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आले होते तर 15 ऑक्टोबरला पुन्हा याच मुद्द्यावरुन राज व उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.