नागपूर : यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते सरकारवर तुटून पडले होते. ओबीसी आरक्षण न मिळण्याला महाविकासचे नेते कसे कारणीभूत आहेत, हे दिवसाआड सांगितले जात होते. आता राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळवून देण्याची अवघड परीक्षा भाजपला पास करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) संथ कारभारामुळे ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) गेले, असा आरोप करणाऱ्या भाजपला (BJP) आता आरक्षण मिळवून देण्यासाठी अवघड परीक्षा द्यावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘भाजपच्या हाती सत्ता द्या, एक महिन्याच्या आत आरक्षण मिळवून देतो’ असा दावा केला होता. तो खरा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण फेटाळून लावल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाशिवाय कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायची नाही, असे जाहीर केले होते. मात्र लगेच झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांना याचा विसर पडला. सहानुभूती मिळवण्यासाठी आघाडी व भाजपने सर्व उमेदवार ओबीसींचे देऊन वेळ मारून नेली होती.
बांठिया आयोगाच्या आडनावावरून जात निश्चित करण्याच्या चुकीच्या पद्धतीकडे फडणवीस यांनीच लक्ष वेधले होते. नंतर ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही ही चूक मान्य केली होती. बांठिया आयोगाला चुकीची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी प्रलंबित आहे. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या इम्पेरिकल डाटा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आणि ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. आता देवेंद्र फडणवीस आपल्या भात्यातून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी कुठले अस्र उगारतात याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.
प्रश्न मार्गी लावण्याची संधी..
इम्पेरिकल डाटा गोळा करायला उशीर केला, समर्पित आयोगाला निधी आणि मनुष्यबळ दिले नाही, महाविकास आघाडीलाच आरक्षण द्यायचे नाही, असे आरोपही भाजपने केले होते. माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस रोजच मिडियाला बाइट देऊन महाविकास आघाडीवर आरोप करीत होते. आता भाजपच्याच हातात राज्याची सत्ता आली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची संधी चालून आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.