Buldhana Lok Sabha Constituency: भाजप-शिवसेनेतील रस्सीखेच प्रतापराव जाधवांसाठी अडचणीची

Prataprao Jadhav, Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता...
Prataprao Jadhav
Prataprao JadhavSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बंड केले. शिंदे यांनी सोबत घेतलेल्या 40 आमदार, 13 खासदारांमध्ये बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. पुढे एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत लढणार आहेत.

बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळणार की नवा चेहरा दिसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्या टर्ममध्ये विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेतील (शिंदे गट) मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हींची हॅटट्रिक केली आहे.

2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी झाले. त्यामुळे विदर्भातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. खासदार जाधव यांनी अगदी सरपंचपदापासून सुरुवात करीत खासदारकीपर्यंतची झेप घेतली आहे. मेहकर तालुक्यातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. नंतरच्या काळात त्यांनी मेहकरमध्ये आपला दबदबा वाढवत नेला.

1999 आणि 2004 मधील विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांनी आपला मतदारसंघ कायम राखला. त्यामुळे शिवसेनेने 2009 मध्ये त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा संधी दिली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये देशभरात मोदीलाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा विजय सोपा झाला. 2019 मध्ये त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला होता. दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर प्रतापराव जाधव यांनी लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत विजय मिळवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prataprao Jadhav
Santosh Bangar: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर गळफास घेणार; शिंदेंच्या आमदारानं केला पण

नाव (Name) :

प्रतापराव गणपतराव जाधव

जन्मतारीख (Birth Date) :

25 नोव्हेंबर 1960

शिक्षण (Education) :

बी. ए. (द्वितीय वर्ष)

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

प्रतापराव जाधव यांचे वडील गणपतराव जाधव हे शेतकरी होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव सिंधुताई जाधव. पत्नीचे नाव राजश्री जाधव असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

नोकरी/ व्यवसाय (Service/Business) :

शेती

लोकसभा मतदारसंघ (LokSabha Constituency) :

बुलढाणा

राजकीय पक्ष (Political Party Affiliation) :

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

प्रतापराव जाधव यांचे राजकारण ग्रामपंचायतीपासून सुरू झाले. 1988 ते 1992 या काळात त्यांनी मेहकर खरेदी -विक्री संघाची निवडणूक लढवली होती. ते अध्यक्ष होते. 1992 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 1993 मध्ये मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राहिले. 1990 मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात ते पराभूत झाले. 1995 मध्ये ते मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.

या काळात त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्रिपद होते. 1997 ते 1998 क्रीडा, पाटबंधारे, राज्यमंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 2009 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2009 मध्ये शिवसेनेकडून त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. 2014 मध्ये देशात मोदीलाटेत प्रतापराव जाधव यांनी सहज विजय मिळविला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा त्यांनी बाजी मारत विजयाची हॅटट्रिक साधली.

Prataprao Jadhav
Sadashivrao patil : सदाशिवराव पाटील सध्या इतके शांत का? मतदारसंघात चुप्पी...

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

खासदार प्रतापराव जाधव यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. हिंदूधर्मीयांचे वैदिक पद्धतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे त्यांनी आयोजन केले. दोनदा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविले. मेहकर येथील शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत केली. रक्तपुरवठा करण्यासाठी नेहमी मदत केली जाते.

ग्रामीण भागात रोगनिदान शिबिराचे आयोजन केले. शेतकरी व शेतमजुरांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्याकरिता त्यांनी अनेक आंदोलने केली. तीनदा त्यासाठी कारावास भोगला आहे. धर्मवीर (स्व.) दिलीपराव रहाटे, बहुउद्देशीय स्मारक समिती स्थापन करून त्या माध्यमातून गरजूंना आर्थिक, शैक्षणिक साह्य ते करीत असतात. अनेक गावांत त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने श्रमदान केले आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

प्रतापराव जाधव हे 2019 बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. जाधव, आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यात ही लढत झाली. प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक कठीण जाईल, असे चित्र दिसत होते. पण अखेर जाधव यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

2019 मधील निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचा विजय झाला. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीत काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. बुलढाण्यात तिहेरी लढत झाली. मात्र, भाजप-शिवसेनेची युती आणि पुन्हा मोदीलाट चालली. जाधव यांचा दांडगा जनसंपर्क आणि अचूक राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

आगामी लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने खासदार प्रतापराव जाधव हे अधिक सक्रिय झाले आहेत. तीनवेळा आमदार आणि तीनवेळा खासदार राहिलेले जाधव यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे. लोकांच्या भेटीगाठी, धार्मिक, सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग हा पुर्वीपेक्षा अधिक वाढला आहे.

विवाह, वाढदिवस किंवा कुठल्याही सुख-दु:खाच्या प्रसंगात ते सहभागी होतात. मतदारसंघातील ग्रामीण भागांतून उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न होतात. अलिकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत बांधावर जाऊन शेतीचे पाहणी केली. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले. ते स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांबद्दल त्यांना कळवळा आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

बदलत्या काळानुसार प्रतापराव जाधव यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. पक्षाची ध्येय-धोरणे, आपल्या जनसंपर्क दौऱ्याची माहिती, नेत्यांची भाषण, मेळावे याची माहिती जाधव आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देत असतात. जिल्ह्यातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेज आणि ट्विटर हॅन्डलवर पोस्ट केल्या जातात. जाधव यांच्याकडे शिवसेना नेतेपदाची जबाबदारी आहे.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

शिवसेनेशी बंड केल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सातत्याने शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला, त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून ऑनलाईन संपर्क करीत होते. त्यामुळेच आम्ही उठाव केल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले होते.

शरद पवार यांच्यासह विरोधकांवर त्यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा आहेत की ओबीसी, हे जनतेसमक्ष जाहीर करावे, असे आवाहन केले होते. हा मुद्दा चर्चेत आला होता. बंडानंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. खासदार जाधव हे माध्यमांसमोर सहसा येत नाहीत. मात्र ज्यावेळी आले त्यावेळी ते विरोधकांचा समाचार घेतल्याशिवाय राहत नाहीत.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru) :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

सकारात्मक मुद्दे (Positive Points About Candidate) :

गेल्या तीन टर्मपासून बुलढाणा मतदारसंघावर प्रतापराव जाधव यांचे वर्चस्व आहे. अगदी सरपंचपदापासून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या जाधवांकडे तीनवेळा आमदारकी आणि तीनवेळा खासदारकी राहिली आहे. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात मदतीला धावून जाणे. तन-मन-धनाने ते मदत करतात. थोरा-मोठ्यांबद्दल आदरभाव, यामुळे जाधव यांचे अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या कार्यालयामार्फत वैद्यकीय, सामाजिक कामात नेहमीच मदत केली जाते.

शिवसेनेशिवाय इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे. कोरोनाकाळात आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावेळी खासदार व जाधव यांनी गायकवाड यांना समज दिली होती. पुढील काळात अशा घटना घडू नये, कोणीही भावनेच्‍या आहारी जाऊ नये, सर्वांनी शब्‍द मोजून मापून वापरले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.

Prataprao Jadhav
Santosh Bangar: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर गळफास घेणार; शिंदेंच्या आमदारानं केला पण

नकारात्मक मुद्दे (Negative Points about Candidate) :

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना फुटली. यावेळी उद्धव ठाकरे यांना सोडून प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी खासदार जाधव यांचा पराभव करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात आहे. तशी तयारीही भाजपकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र लढत असल्याने त्याचा फटकाही जाधव यांना बसण्याची शक्यता आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत प्रतापराव जाधव हे सहज निवडून आले होते. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. वंचित बहुजन आघाडीही बुलढाणा जिल्ह्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences) :

प्रतापराव जाधव यांना शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचे कारण गेल्या तीन टर्मपासून खासदार असलेल्या जाधवांना मतदारसंघाची संपूर्ण माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांचे राजकारण या जोरावर त्यांनी स्वतःची ‘व्होट बॅंक’ तयार केली आहे. भाजपकडून ही जागा घेण्याचा प्रयत्न होताना सध्या दिसत आहे. मात्र शिंदे गटाला ही जागा सोडायची नसल्याचे समोर आले आहे. जाधव यांना उमेदवारी नाकारल्यास त्याचा महायुतीला मोठा फटका बसू शकतो.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Prataprao Jadhav
Jalna Lok Sabha Constituency : रावसाहेब दानवेंना धडकी भरवणारे काँग्रेसचे कल्याण काळे पुन्हा मैदानात उतरणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com