

Maharashtra MLC Election 2026 : राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघातील मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दबावाचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. पुण्यात शिंदेसेनेकडून चिवटे यांनी उमेदवारी दाखल केल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांकडूनच संभाव्य बंडखोरीचे संकेत मिळत असल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजपने (BJP) प्रतिष्ठेची केल्याचे मानले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे शिवसेनेने मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. चिवटे यांच्या उमेदवारीला शिंदेसेनेतील काही नेत्यांनीही विरोध दर्शविल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांनी 'आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, मंगेश चिवटेंना नाही', अशी भूमिका मांडल्याने शिंदेसेनेतच या उमेदवारीवर एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुण्यातील उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने आता भाजपने अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा मुद्दा पुढे केला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटल्यानंतरच अमरावतीतील उमेदवार जाहीर केला जाईल, असे भाजपकडून संकेत दिले जात आहेत. त्यामुळे पुण्यात एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्रपणे मंगेश चिवटे यांना मैदानात उतरविल्यास, अमरावतीत भाजपकडूनही स्वतंत्र उमेदवार देण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी, एका मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय दुसऱ्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो.
अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्या नावांची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चिवटे यांनी पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजप अमरावतीत नेमका कोणता चेहरा मैदानात उतरवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुणे आणि अमरावती या दोन्ही शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारीचा निर्णय आता केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकमेकांवर राजकीय दबाव आणत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांची उमेदवारी कायम राहते का, भाजप पुण्यातील निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेते आणि त्याचा परिणाम अमरावतीतील उमेदवारीवर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीतील या रस्सीखेचीत अखेर कोणाची सरशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.