
Yavatmal News : शेतकर्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणार्या यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असले तरी महायुतीने अध्यक्ष आपलाच व्हावा, यासाठी कंबर कसली आहे. त्यातूनच आता वेगवेगळे राजकीय समीकरणे मांडत अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या नावासाठी एकमत करण्याच्या हालचालींना प्रारंभ झाला आहे. परिणामी आता दोन्ही बाजूने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या स्थितीत शेतकर्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात यावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची चढाओढ लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दोन गटांत विभागली गेली आहे. त्याचे राजकीय परिणामही जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडीत दिसून येत आहे. जिल्हा बँकेत संचालक असलेल्या सर्वच पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.
महाविकास आघाडी असो अथवा महायुती दोघांकडूनही इच्छुकांची संख्या कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. आता बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २५ सप्टेंबरला म्हणजेच दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. असे असले तरी महायुतीकडून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकास आघाडीचा झाल्यास जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळ विधानसभेचे आमदार मदन येरावार यांना हा जोरदार हादरा असेल, असेही राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यातूनच सक्षम उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी बैठकांच्या सत्राला वेग आला आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती आणि उमेदवारही ठरेल. मात्र, २५ सप्टेंबरला ऐनवेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांची ऐनवेळी घोषणा केली जाणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
काँग्रेस : मनीष पाटील, प्रकाश पाटील देवसरकर
राष्ट्रवादी अजित पवार गट : वसंत घुईखेडकर, अनुकूल चव्हाण
भाजप : अमन गावंडे
शिवसेना शिंदे गट : राजुदास जाधव
शिवसेना ठाकरे गट : संजय देशमुख
अपक्ष : स्नेहल भाकरे
महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असले तरी ही निवडणूक महायुतीच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यातूनच संख्याबळ जुळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. परिणामी महाविकास आघाडीपुढे त्यांच्याकडे असलेले संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.