
Shivsena UBT News : कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या विडंबनात्मक गाण्याने राज्याच्या राजकारणात आग लावण्याचे काम केले. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर तुटून पडले आहेत. कामरावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी होत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सोबत असलेले छायाचित्र व त्यावर भाष्य करत अंधारे यांनी 'एक्स'वर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 'निम हकीम खतरे मे जान' अशी एक आमच्या गावाकडे म्हण आहे.
बिनडोक लोकांमुळे कशी संकटनिर्मिती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कालची तोडफोड आहे. मागे पडलेला विषय पुन्हा पुढे आणत जाणीवपूर्वक गद्दार म्हणून चर्चेत कोण आणतंय हे शोधण्यासाठी शिंदेंनी आजूबाजूला बसणारे तपासून घेतले पाहिजेत, असा सल्ला यातून सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना दिला आहे.
सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी या सगळ्या वादामागे भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नाही ना? अशी शंका शिंदे-फडणवीस यांचे एकत्रित छायाचित्र पोस्ट करत उपस्थित केली आहे.
शिवसेना पक्ष फोडून चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे भाजपाला जावून मिळाले. तीन वर्षापुर्वीच्या या बंडाला शिंदे उठाव म्हणतात. तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष याला गद्दारी, पक्ष, चिन्ह आणि आमचा बापही चोरला, म्हणून हिणवतात. शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला करण्यात सुषमा अंधारे या आघाडीवर राहिल्या आहेत.
कुणाल कामरा याने शिवसेनेतील याच बंडाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले. ते सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याचा शो ज्या हाॅटेलमध्ये होते, तिथे जाऊन स्टुडिओची तोडफोड केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसापासून हा विषय धुमाकूळ घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी कामरा याने माफी मागितली पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली स्वैराचार खपवून घेणार नाही, असा दम दिला.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंचे नाव घेतले का? तुम्ही गद्दार आहात हे तुम्हाला पटले का? असे म्हणत टोला लगावला. तर अंबादास दानवे यांनी कुणाल कामरा चुकीचे काही बोलला नाही, एकनाथ शिंदेंनी गद्दारीच केली, त्यामुळे माफी मागण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि त्यांचा पक्ष कुणाल कामराला बळ देतोय, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
यावर आता सुषमा अंधारे यांनी आता थेट भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. बिनडोक लोकांमुळे कशी संकटनिर्मिती होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कालची तोडफोड आहे.
मागे पडलेला विषय पुन्हा पुढे आणत जाणीवपूर्वक गद्दार म्हणून चर्चेत कोण आणतंय हे शोधण्यासाठी शिंदेंनी आजूबाजूला बसणारे तपासून घेतले पाहिजे, असा सल्ला अंधारे यांनी शिंदेंना दिला. यावर आता शिंदे किंवा भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.