Kalyan East Constituency News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी गोळीबार केला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते आजतागायत ते तुरुंगातच आहे. या घटनेनंतर कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीच्या भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर नाराज महेश गायकवाड आणि इतर शिवसैनिकांनी सुलभा गायकवाड यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला होता.दरम्यान, त्याच सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तब्बल 24 दिवसांनंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाला होता. या प्रकरणात गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबारानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं.
महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवस हॉस्पिटलमध्येच तळ ठोकला होता. ते रात्रभर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये थांबून होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच ते घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई, शहाजी बापू पाटील आदी नेत्यांनी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.
याचवेळी अटक झाल्यानंतर गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. पण आता त्याच गणपत गायकवाडांच्या पत्नीच्या प्रचारार्थ खुद्द श्रीकांत शिंदेच उपस्थित राहिल्याने महेश गायकवाड समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
कल्याणच्या पूर्व भागात महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मोठी टशन सुरू होती लोकसभा निवडणुकीत येथील वातावरण काहीसे निवळले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये चुरस पाहायला मिळत होती. पण अखेर महायुतीत ठरल्या फॉर्म्यु्ल्याप्रमाणे अखेर ही जागा भाजपकडे गेली.
यापूर्वी भाजपच्या कल्याण जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनात आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते गणपत गायकवाड विधानपरिषदेत मतदानासाठी आले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.