Ajit Pawar Letter : '...आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू!'; अजितदादांना कुणी लिहिलं रोखठोक पत्र?

NCP Political News : बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र,शरद पवारसाहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय.
Ajit Pawar  .jpg
Ajit Pawar .jpgSarkarnama
Published on
Updated on

NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला आता जवळपास सव्वा वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. नवीन नाव आणि चिन्ह असूनही शरद पवारांच्या करिष्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दमदार कामगिरी करताना दहापैकी आठ जागा जिंकल्या. तर अजित पवार गटाला चारपैकी एकच जागा जिंकता आली

सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातून सध्या विस्तवही जाताना दिसत नाही.अशातच गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच एका कार्यकर्त्यांनं आपलं रोखठोक मत व्यक्त करत थेट अजितदादांनाच पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. पण 'सरकारनामा' या पत्राची पुष्टी करीत नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना एका कार्यकर्त्यांनं निनावी पत्र लिहिले आहे.या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या कार्यकर्त्यानं आपल्या मनातील भावनांना कुठलाही आडपडदा न ठेवता जशाच्या तशा पत्रात व्यक्त केल्या आहेत. आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडल्याचंही पत्रात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यापासून त्यांच्या रोखठोक स्वभाव,हटके भाषणशैलीसाठी ओळखले जातात.त्यांची पक्षावर आणि प्रशासनावर जबरदस्त वचक असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अजितदादांचा हाच स्वभाव काहीसा हरवलेला पाहायला मिळत आहे. त्या कार्यकर्त्यानंही याच मुद्द्यावर बोट ठेवलं आहे.

Ajit Pawar  .jpg
Eknath Shinde On Rahul Gandhi : आरक्षणावर राहुल गांधींचं मोठं विधान; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'पोटातलं खरं त्यांच्या ओठावर आलं'

पत्रात नेमकं काय म्हटलंय..?

कार्यकर्ता पत्रात म्हणतो, आदरणीय दादा,बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो.‌ पण, काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळे कापड लावलं गेलं. तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही.

आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय कारण, नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का? हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणं सुध्दा पार बदलून गेलंय.

Ajit pawar letter 2.jpeg
Ajit pawar letter 2.jpegSarkarnama

'तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती...'

तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात 'चूक' झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न माझ्या सारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तोचं संभ्रम तुमच्या काल-परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकच गडद केलाय.

सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा 'सूर' नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळविताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा,रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? अशी भीती वाटत राहते असंही कार्यकर्ता आपल्या पत्रात नमूद करतो.

Ajit Pawar  .jpg
Amol Kolhe: पवारसाहेबांना सोडून गेलेला नेता राजकारणात टिकत नाही; अमोल कोल्हेंचा रोख कुणाकडे?

'तुझी ग्रामपंचायत आली का रे' किंवा 'माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं' असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्या सारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाचं नव्हे तर, आपले सगळे जीवाभावाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत.

कारण, वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेचं जबाबदार आहोत, अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहणे, आता सहन होत नाहीये, जीवाची घालमेल होत असल्याचंही पोटतिडकीने पत्रात लिहित आहे.

बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र,शरद पवारसाहेबांच्या (Sharad Pawar) लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय.

आता आम्ही एकमेकांचे तोंड सुध्दा बघत नाही. कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या, तरी आमच्यावर संशय घेतला जातो. एवढं कलुषित वातावरण झालंय. अशावेळी तुम्ही मात्र, माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीच पंचाईत केलीय. त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला, आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येवू नये?असा सवालही अजितदादांना या कार्यकर्त्यांनं केला आहे.

Ajit Pawar  .jpg
Ayodhya Poul : 'वर्षा'वर जाण्याचे कारण ठाकरेंच्या वाघिणीने सांगूनच टाकलं, फोटो दाखवत पुरावेही दिले

तुम्ही इतके हतबल का दिसत आहात..?

दादा, लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होवू नका. विकासाला महत्त्व द्या. भावनिक होवून प्रश्न सुटणार नाहीत, असं म्हणत होतात. भावनिक होवून रडले म्हणून तुम्ही सुध्दा तशीच जाहीर ॲक्टिंग केली होती.

पण, आता मात्र तुम्ही स्वत: खूपच भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय. त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात? तुमचा आत्मविश्वास पहिल्यासारखा का दिसत नाही? तुम्ही कसल्यातरी ओझ्याखाली दबलेले आहेत, असे वातावरण का निर्माण झाले आहे? आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत असल्याचीही जाणीव हा कार्यकर्ता आपल्या पत्रातून अजित पवारांना करुन देतो.

दादा, तुम्हाला आठवतंय का? पवारसाहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला. पुढे तुमच्या आणि वहिनींच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादासाठीही मी फिरलोय, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन. कारण, आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्यासोबत आहेत. वडिलांकडून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलोय. 'विकासाचा वादा, अजितदादा' आणि 'एकच वादा, फक्त अजितदादा' अशा घोषणाही अगदी बेंबींच्या देठापासून देत आलोय.

'दादा, तुमच्याबद्दल कुणीही काहीही बरळतं,तरीही...'

म्हणून तर, तुमच्यासाठी आम्हाला विरोधकांनी 'मलिदा गँग' म्हटलं. आम्ही तेही गपगुमानं सहन केलं. कारण, माझ्यासाठी माझे दादाच, माझं काळीज आहे. आता तेच दादा, आम्हा सगळ्यांना शंकेने किंवा संशयाने पाहणार असतील तर, मी काय करायला हवं? सध्या 'ना घर का न घाट का' अशीच माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आवस्था झाली आहे. मग, ज्या पवारसाहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली. मान-सन्मान मिळाले. त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्ही नेमकं काय मिळवलं? असंही वाटतंय.

दादा,अलिकडे तुमच्याबद्दल कुणीही काहीही बरळतं. तरीही तुम्ही गप्प बसता. नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात. पण, त्यांना कुणीही सिरीयसली घेत नाहीत. त्या तानाजी सावंतपासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाकेपर्यंत सगळे तुमच्यावर तोंडसुख घेत आहेत आणि तुम्ही मात्र, आमच्यावर नाराज होवून आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यांत उभं केलंय, याचं फार वाईट वाटतंय.

आपल्या बारामती विधानसभेत तुतारीला 47 हजार 381 मतांचं लीड मिळालं आणि वैनींचा पराभव झाला. त्यामुळे तुम्ही रागावलात. तुमचं रागावणं स्वाभाविक आहे. तो पराभव जसा तुमच्या 'जिव्हारी' लागलाय, तसा तुमचा निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची 'सल' मलाही आहे. पण, जास्त ताणू नका. रात गयी, बात गयी! म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात. निराशेची जळमटे फेकून द्या. जिद्दीने उभे राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू! असा विश्वासही हा कार्यकर्ता आपल्या पत्रातून अजितदादांना देत आहे.

Ajit Pawar  .jpg
Eknath Shinde : 'त्या' वादग्रस्त विधानांना CM शिंदेंचा पाठिंबा? महायुतीतील संघर्ष आणखी उफाळून येणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com