
Mumbai, 03 December : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे कालपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. राज्याच्या मंत्रिमडळात राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ मंत्रिपदाची अपेक्षा आहे. तसेच, केंद्रात प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यपालपद मिळावे, यासाठी अजित पवार हे आग्रही असल्याची माहिती आहे. आता राष्ट्रवादीच्या पदरात किती मंत्रिपदे पडतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ४१ जागा मिळाल्या आहेत. येत्या गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यात कोणाला किती मंत्रिपदे येतात, याची उत्सुकता त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यालाही आहे.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमधील धूसफूस संपल्यानंतर गृहमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अजेंडा पुढे रेटण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सत्तेत आपल्याला चांगल्या मंत्रिपदासह केंद्रात ही संधी मिळावी, यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीत दाखल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची अजित पवार यांना प्रतीक्षा आहे. या भेटीत ते शहांकडे राज्यात नऊ मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी करणार आहेत. यामध्ये सात कॅबिनेट मंत्रिपदे आणि दोन राज्यमंत्रिपदे असावीत, असा अजित पवार यांचा आग्रह आहे. तसेच, केंद्रात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद देण्यात यावे. तसेच एक राज्यपालपद मिळावे, अशीही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आहे.
खरं तर नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी वेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र पदभाराचे राज्यमंत्रिपदाची ऑफर भाजपकडून देण्यात आली होती. मात्र, प्रफुल पटेल यांनी यापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे, त्यामुळे पटेलांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
दरम्यान, महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल नऊ कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली होती. आता तेवढी मंत्रिपदे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार का, हा खरा प्रश्न आहे. अजित पवार हे अमित शहा यांच्यापुढे राज्यातील मंत्रिपदाबाबत मागणी करणार आहेत, त्यात दादांच्या पदरात किती मंत्रिपदे पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.