Mumbai News : शिवसेनेत असताना रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनाच महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. भ्रष्टाचार हे उमेदवारीचे मेरिट आहे का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विचारला आहे. ईडीच्या चौकशीला जाताना ते ढसाढसा रडत होते. शिवसैनिक वाट पाहत होता रवींद्र वायकरांना उमेदवारी कधी मिळेल. या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची हे समजेल, असा टोलाही परब यांनी लगावला आहे.
शिवसेनेत असलेल्या राहुल शेवाळे, यामिनी जाधव, वायकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्ट्राचाराचे आरोप करून त्यांच्या चौकश्या लावल्या होत्या. मात्र हीच मंडळी शिंदे गटात गेल्यानंतर स्वच्छ झाली. त्यांनाच महायुतीच्या माध्यमातून भाजपला उमेदवारी द्यावी लागली.
या नेत्यांचा भ्रष्टाचार भाजपला मान्य आहे का, अशी विचारणा परब यांनी केली आहे. मुंबईमधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर हे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच शिंदे गटात गेल्यानंतर उमेदवार झाले, असा आरोप परब यांनी केला. वायकर यांना उमेदवारी कधी मिळेल, याची वाट शिवसैनिक पाहत होता. या निवडणुकीत त्यांना कळेल खरी शिवसेना कोणाची. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर नवखे नाहीत गेले दहा वर्षांपासून ते त्यांच्या वडीलांचे काम करत आहेत. ते एकटे नाहीत. त्यांच्याबरोबर माझ्यासह सुनील प्रभू आणि इतर नेते देखील भक्कमपणे उभे आहेत, असेही अनिल परब म्हणाले.
भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांच्या विरोधात भ्रष्ट्रचाराचे आरोप केले. ही सर्व मंडळी तुरूंगात जातील, अशा वल्गना केल्या होत्या. त्यांनाच महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार करण्याची वेळ आता भाजपचे नेते सोमय्या यांच्यावर आली आहे. भाजपला भ्रष्टाचार मान्य आहे का? या उमेदवारांचा भ्रष्टाचार हे मेरिट आहे का? असा प्रश्न ही परब यांनी उपस्थित करत भाजप नेत्यांची खिल्ली उडविली आहे.
महायुतीने लोकसभेची तिकीटे दिलेल्या यामिनी जाधव, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उतरावे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने सोमय्या यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करणार असल्याचे सांगत परब यांनी खिल्ली उडविली. मुंबई पुरतं का होईना, सोमय्या यांनी या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.