Devendra Fadnavis: मुंबईतल्या एका प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त मुलाखतीवर भाष्य केलं आहे. मी टोपी फेकली आणि ती संजय राऊतांनी थेट दोघांच्या डोक्यावर घातली अशी टिप्पणी फडणवीसांनी केली. त्याचबरोबर मुंबईत तुम्ही इतकी वर्षे सत्ता गाजवली पण काम काय केलं? असा सवालही त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, "मी कोणाचं नाव घेतलं नाही कोण कन्फ्युज्ड आणि कोण करप्ट आहे. पण ज्यावेळी ठाकरे बंधुंची मुलाखत झाली तेव्हा संजय राऊत यांनीच तिथं म्हटलं की, राजसाहेब तुम्हाला फडणवीस कन्फ्युज्ड म्हणाले आणि तुम्हाला फडणवीस करप्ट म्हणाले. आता मी टोपी फेकली ती संपादक साहेबांनी थेट त्या दोघांच्या डोक्यात घातली आणि त्यांना अधोरेखित केलं की कोण कन्फ्युज्ड आहे आणि कोण करप्ट आहेत.
या मुलाखतीत ते असंही म्हणाले की फडणवीसांना काय समजतं? भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते कोणीच मुंबईत जन्मले नाहीत यांना मुंबईचे प्रश्न काय कळतात. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्यात झाला होता मुंबईत झाला नव्हता. मग मुंबईत जन्मलेले सांगतात की आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून आम्हाला मुंबई माहिती आहे. आता तुम्ही मुंबईतच जन्मून म्हातारे व्हायला लागलात, तरी मुंबईत तुम्ही काय केलंय हे दाखवा ना. मुंबईतला एक प्रोजेक्टही तुम्ही दाखवू शकत नाही, मग फायदा काय? ज्या १०६ हुतात्म्यांनी मुंबईसाठी रक्त सांडलं त्यापैकी कितीजण मुंबईत जन्मलेले होते. यात कोकणातील, पश्चिम महाराष्ट्रातील, विदर्भातील, मराठवाड्यातून आलेले होते.
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांगलीत जन्मले होते. शाहीर अमर शेख बार्शीत जन्मले होते. मुंबईवर प्रेम करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही जन्म मुंबईचा नव्हता. आचार्य अत्रे हे देखील मुंबई बाहेर जन्मलेले होते. मुंबईतला गिरणी कामगार हे सांगली, कोल्हापूर, सिंदुदुर्ग या भागातून आलेले होते. मग यांना मुंबईतलं काय माहिती असं आपण म्हणणार का? माझा जन्म मुंबईत झाला नसला तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. म्हणू मुंबईच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला या मुंबईला बदलून दाखवण्याचं काम आम्ही केलं.
या मुंबईतला सामान्य मुंबईकर याच स्वप्न काय आहे? एक स्वतःचं घर असलं पाहिजे. मुंबईतला मराठी माणूस मुंबईत घर परवडत नाही म्हणून तो वसई-विरारला गेला. २५ वर्षात तुम्ही त्याला घर देऊ शकला नाहीत. पण त्याचवेळी बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला ८० हजार लोकांना या मुंबईबाहेर जन्मलेल्या माणसानं करुन दाखवलं. १०० फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला आम्ही ५०० फूटांचं घर दिलं. पत्राचाळ, अभ्युदय नगर प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाला आम्ही घर देण्याचं काम केलं.
एसआरएच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. लोकांना घरं देण्याऐवजी बिल्डरांना ट्रेडिंग दिलं. पण आम्ही त्याच एसआरएमध्ये काम न करणाऱ्या बिल्डरांना जेरबंद केलं, आणि त्याचं काम चालू केलं. वर्षानुवर्षे झोपडपट्टीत राहणाऱ्या लाकांना भाडं मिळालं नव्हतं ते आम्ही सरकारच्या माध्यमातून दिलं. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामान्य माणसाचं घराचं स्वप्न ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला, असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.