Chhagan Bhujbal news : मिशी काढली, खोटी दाढी अन् हातात सिगार..! इक्बाल शेख यांची वेशभूषा करत भुजबळांचा गनिमी कावा

Maharashtra Karnataka border dispute : अनेक जवळच्या व्यक्तींनीही मला ओळखले नाही. मुंबईहून गोवा मार्गे बेळगावकडे जाताना पोलिसांचा ससेमिरा चुकवत अखेर बेळगावात प्रवेश करण्यात यश आले, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.
Chhagan Bhujbal (X post)
Chhagan Bhujbal (X post)Sarkarnama
Published on
Updated on

Political history Maharashtra : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमाप्रश्न अनेक वर्षांनंतरही कायम आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून मोठा लढा उभा राहिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही ४० वर्षांपूर्वी कर्नाटक पोलिसांना चकवा देत बेळगावात प्रवेश करत आंदोलन छेडले होते. त्यासाठी त्यांनी मिशी काढत संपूर्ण वेशभूषा बदलली होती. आज भुजबळांनी त्या लढ्याची आठवण काढली.

काय म्हटले आहे भुजबळांनी?

छगन भुजबळ यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी बेळगावच्या भूमीत घुमलेल्या ऐतिहासिक लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मराठी माणसांवर होत असलेल्या सरकारी अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहून मराठी जनतेच्या हक्कांसाठी दिलेला तो लढा आजही तितकाच प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे.

१९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी यांसारखे मराठी भाषकबहुल भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या मनातील वेदना आणि मराठी जनतेच्या न्यायाच्या लढ्याचे प्रतीक बनला. दुर्दैवाने, अनेक दशकांनंतरही या प्रश्नाची अद्याप सुटका झालेली नाही, याची खंत भुजबळांनी व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal (X post)
Congress news : दक्षिणेत काँग्रेसमध्ये फूट; शिवकुमारांच्या शपथविधीला दांडी, बड्या नेत्याने वादग्रस्त मुद्यालाच घातला हात

नेमकं काय घडलं?

जून १९८६ मध्ये सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नड भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषकांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नाविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. मात्र, मराठी स्वाभिमानासाठी कोणतीही अडचण आडवी येऊ नये, या निर्धाराने गनिमी काव्याची रणनीती आखण्यात आली.

मी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मिशी काढून, शर्ट-पॅन्ट, गळ्यात टाय, खोटी दाढी आणि हातात सिगार घेऊन दुबईचे व्यापारी ‘इक्बाल शेख’ यांचा वेश धारण करून कर्नाटकात कूच केली. ही वेशभूषा इतकी अचूक होती की अनेक जवळच्या व्यक्तींनीही मला ओळखले नाही. मुंबईहून गोवा मार्गे बेळगावकडे जाताना पोलिसांचा ससेमिरा चुकवत अखेर बेळगावात प्रवेश करण्यात यश आले, असे भुजबळांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal (X post)
TVK Congress news : केवळ पाच आमदार असूनही राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा होणार दणदणीत विजय

४ जून १९८६ च्या रात्री बेळगावात पोहोचून, दुसऱ्या दिवशी शेकडो शिवसैनिकांसह कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या अनपेक्षित आणि धाडसी कृतीने कर्नाटक प्रशासन हादरून गेले. त्यानंतर धारवाड जिल्हा कारागृहात तब्बल १६ दिवस शासकीय कोठडी भोगावी लागली. या संघर्षात दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक आणि असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिल्याची आठवणही भुजबळांनी सांगितली आहे.

आज चार दशकांनंतर त्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा जाग्या होत आहेत. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी उभा राहिलेला तो लढा केवळ एका आंदोलनाची कथा नव्हती, तर मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायासाठी दिलेल्या संघर्षाचे प्रतीक होता. मराठी माणसाच्या हक्कांचा हा आवाज आजही तितक्याच ताकदीने घुमत आहे आणि पुढेही घुमत राहील, अशी भावना भुजबळ यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com