

CJP Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात संध्याकाळी ४ वाजता जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर वकिलांनी एक मोठी घोषणा केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीनं या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर त्याला समाजातील विविध वर्गाकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर या आंदोलनाबाबत जेनझींसोबतच इतर नागरिकांचाही पाठिंबा असल्याचं कळतं आहे. त्यातच आता पालघर जिल्ह्यातील वकिलांच्या संघटनेनं देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई लॉयर्स असोसिएशननं जाहीर केलं आहे की, "या आंदोलनादरम्यान जर सीजेपीच्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी काही मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न केला. जर कार्यकर्त्यांवर जबरदस्तीनं गुन्हे दाखल केले गेले तर त्यांना मोफत कायदेशीर मदत दिली जाईल" असोसिएशनचे प्रवक्ते दिगंबर देसाई यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
डॉक्टरांच्या संघटनेनं देखील सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनासाठी डॉक्टर मंडळी सज्ज आली असून दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईचा अनुभव लक्षात घेता या डॉक्टर मंडळींनी फर्स्टएड कीटसह शिवाजी पार्कमधील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याचाच अर्थ आंदोलकांना या डॉक्टर मंडळींकडून वैद्यकीय मदत दिली जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसनं निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात एक खळबळजनक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांपैकी दोन आयुक्तांच्या मतांना किंमत दिली जात नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून एकतर्फी हुकुमशाही पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत. देशभरात सुरु असलेल्या SIR प्रक्रियेबाबत उर्वरित दोन्ही आयुक्तांनी लिखित स्वरुपात कॅबिनेट सचिवांकडं मुख्य निवडणूक आयुक्तांकडं नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांच्या मताकडं दुर्लक्ष करण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं होतं. या बातमीनंतर देशभरात एकच कळबळ उडाली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशातील लोकसभा आणि त्यानंतरच्या निवडणुका हायजॅक केल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.
देशात दबाव गट म्हणून काम करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनं यानंतर तातडीनं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासाठी त्यांनी मुंबईसह दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार, देशाला स्वातंत्र मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनीच म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जेलभरो आंदोलनाची घोषणा केली, त्यानुसार संध्याकाळी ४ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मैदानात मोठ्या संख्येनं समर्थक गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.