Mumbai News : मुंबईत सध्या राष्ट्रीय आमदार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशभरातील आमदार, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, माजी आमदार, माजी विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत.
यानिमित्ताने काल (शुक्रवारी) महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शासकीय निवासस्थानी डिनर डिप्लोमसी रंगली. यावेळी संसदीय आयुधांचा वापरावर खलबतं झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय आमदार परिषदेचा काल पहिला दिवस होता. या परिषदेच्या निमित्ताने रात्री राहुल नार्वेकरांच्या घरी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अन्य राज्याचे सभापती, अध्यक्ष, आमदार यावेळी नार्वेकरांच्या निवासस्थानी होते.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.याबाबत संसदीय आयुधांचा वापर कसा करता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. पण या निकालासाठी अध्यक्ष कितीही वेळ घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना कोणाची आहे आणि प्रतोदपदी कोण राहील, याबाबत आधी निर्णय होईल आणि त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. भरत गोगावले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी रद्द केलेली नाही, असेही नार्वेकर यांनी नमूद केल्याने त्यांच्या फेरनियुक्तीचेही संकेत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागण्याची चिन्हे आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.