
Mumbai, 05 December : मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर नाराज झालेले एकनाथ शिंदे अखेर शपथविधीच्या काही तास अगोदर उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी झाले आहेत, त्यामुळे शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री होण्याचा सस्पनेस अखेर संपला आहे. शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याची माहिती असून त्यांना महसूल मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजे शिंदेंना आपल्या मनातील गृहमंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुती सरकारचा (Mahayuti) शपथविधी सोहळा आज (ता. ०५ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद फडणवीस हे शपथ घेणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता होती.
मुख्यमंत्रिपद नाकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कमालीचे नाराज झाले होते. त्या नाराजीतूनच ते आपल्या मूळगावी सातारा जिल्ह्यातील दरे गावी आले होते. दोन ते तीन दिवसानंतर ते पुन्हा मुंबईत परतले होते. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जो निर्णय घेतील, त्याच्या आड मी येणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट केले होते.
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी गृहमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, भाजपने तेही शिवसेनेला सोडण्यास नकार दिला होता. मात्र, गृहमंत्रिपदाबरोबर नगरविकास खातंही भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे शिवसेनेचा आग्रह सध्या महसूल मंत्रिपदासाठी आहे. ते खातं तरी शिंदे यांना मिळणार का, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडून पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे आपल्या सहकाऱ्यांपुढे बोलताना सांगितले होते. मात्र, शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला. त्यानंतरही शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, पडद्याआडून बरेच राजकारण सुरू होते. विशेष म्हणजे का देवेंद्र फडणवीस हेही शिंदेंना भेटून गेले.
शपथविधी सोहळ्याला अवघे तीन तास उरले असताना शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांना महसूल खाते मिळणार असल्याची महिती आहे. त्यामुळे गृहमंत्री आणि नगरविकास विभागानंतर शिंदे यांना महसूल मंत्रिपद संभाळावे लागण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.