Kalyan Dombivali News : कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील बिघाडीचे चित्र पुन्हा एकदा दिसून आले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी मनसेला तर शिंदे गटाचे पदाधिकारी ठाकरे गटाला मदत करत फिरत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा झाल्यानंतर सूत्रे हलली.
भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना ठाणे जिल्ह्यातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर नोटीस धाडत तडीपार करण्यात आले आहे. महायुतीकडून (Mahayuti) भाजपाला घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा आता रंगली आहे. यामुळे भाजपाचे पदाधिकारी नाराज असून आता भाजपा काय पावलं उचलत हे पहावे लागेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये लोकसभा निवडणूकिपासून कलगीतुरा रंगला आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीणमध्ये याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत देखील दिसून येत आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे आमदार राजू पाटील हे उमेदवार असून येथून महायुतीच्या शिंदे गटातील राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोरे यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कंबर कसली आहे.
मात्र, शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी हे उघड उघड शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांचा प्रचार करत आहेत. तर भाजपाचे पदाधिकारी हे मैत्री जपत मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षाचा प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात महायुतीमधील वरिष्ठांनी पावलं उचलत त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. आता तर भाजपच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना तडीपार करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. याच दरम्यान दुसऱ्या ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी मनसेचे आमदार पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले होते. या सभेमुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील भाजप पदाधिकारी संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली आणि आज दुपारी मानपाडा पोलिसांनी त्यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. माळी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असून, सध्या ते मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.
विशेष म्हणजे बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रचारसभा घेतली, आणि त्याच सभेनंतर माळींना तडीपारची नोटीस मिळाली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, "भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, तर दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांवरही अशीच कारवाई का केली जात नाही?" असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, ठाणे जिल्ह्यात अनेक गुंड असतानाही ते हद्दपार केले जात नाहीत, मात्र भाजपशासित राज्यात भाजप पदाधिकाऱ्यांवरच अशी कारवाई ऐन निवडणुकीत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
तसेच, ठाणे जिल्ह्यात अनेक गुंड असतानाही ते हद्दपार केले जात नाहीत.मात्र, भाजपशासित राज्यात भाजप पदाधिकाऱ्यांवरच अशी कारवाई ऐन निवडणुकीत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरच अशी कारवाई झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. या घटनेमुळे भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, आणि या वादाचा फटका ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाच्या उमेदवारांना आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी त्यांच्यावरील तडीपारीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे. कोणाला घाबरणारा माणूस नाही. मला पोलीस ठाण्यात बोलावून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. लोकसभेमध्ये युती म्हणून आम्ही युतीधर्म पाळला आहे. कोणालाही दमदाटी केलेली नाही, त्रास दिलेला नाही. तरीसुद्धा फक्त राजू पाटील हे माझे मित्र आहेत. मैत्री केली तर किती त्रास झाला आहे पाहा. मी आगरी समाजाला आवाहन करतो. तसेच भाजपाचे कल्याण ग्रामीणचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आवाहन करतो.
आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या तुमच्यावर येऊ शकते. कारण लोकसभेमध्ये युतीधर्म पाळला त्याचे फळ मला मिळाले आहे. आता तरी जागे व्हा. लोकसभेत मनसेने आपल्याला मदत केली होती. राजू पाटील हे माझे जवळचे नातेवाईक देखील आहेत. त्यांना मदत केली असा संशय आल्याने मला तडीपार करण्यात आले आहे, असेही माळी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.