Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि IPS महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून अजित पवारांवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. अजितदादांनी स्वत:स्पष्टीकरण देऊनही हे प्रकरण थांबण्याचं काही नाव घेताना दिसून येत नाही. आता या प्रकरणात पोलिस दलातील माजी DGP ची एन्ट्री झाली आहे.
अजित पवारांनी (Ajit Pawar) अवैध मुरुम उत्खननविरोधात सुरू असलेली कारवाई रोखल्याचा आरोप होत असलेल्या प्रकरणी आता महिला पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर राष्ट्रवादीकडूनच झोड उठवली जात आहे. कृष्णा यांच्या कारवाईवरच शंका उपस्थित केली जात आहे. तर विधान परिषदेचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींची मजल तर थेट यूपीएससीला पत्र लिहिण्यापर्यंत पोहोचली आहे.
पण आता आयपीएस आणि करमाळा पोलिस अधिक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या मदतीला डॅशिंग माजी पोलीस अधिकारी सरसावले असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच गैरवर्तनाचा ठपका ठेवला आहे. तसेच त्यांनी अजितदादांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
एकेकाळी अंडरवर्ल्ड हादरवून सोडणारे महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी महिला आयपीएस अंजना कृष्णा यांना पूर्णपणे पाठिंबा त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहे.याचवेळी त्यांनी पोलिस सेवेत असताना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या अशा महिला अधिकाऱ्याच्या पाठिंब्यासाठी समाजानं पुढं यायला हवं, अशी भूमिकाही मांडली आहे.
यावेळी राज्याचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी यापूर्वी महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसोबत असा व्यवहार कधीच होत नव्हता, असंही म्हटलं. यावेळी त्यांनी वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, आर आर पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा कामाच्या पध्दतीचा संदर्भही दिला.
त्याचवेळी डी. शिवानंदन यांनी अजित पवारांवर गैरवर्तनाचा आरोप करतानाच त्यांना खडेबोलही सुनावले. सहावेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आणि एका मोठ्या राजकीय घराण्याचा राजकीय वारसा असलेल्या अजित पवार यांनी अशी कृती केल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले.
ते म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यानं पोलिस कारवाई रोखण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यानाच फोन लावला. आणि DCM यांनी पण फोनवरून अधिकाऱ्याला कॉल करून अवैध उत्खननावरील कारवाई थांबवण्याचे निर्देश देताना दिसले. यावेळी समोरचा अधिकारी कोण आहे, तो ट्रेनी आहे की अजून काय याचाही विचार करण्यात आला नसल्याचं डी. शिवानंदन यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं प्रशासकीय वातावरण एक नंबर राहिल्याचा उच्चारही केला. पण आता आपण दिवसेंदिवस एक नंबरवरुन खाली घसरत चालल्याची खंतही बोलून दाखवली. प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अंजना कृष्णा या एकट्या पडल्याचं दिसून येत असतानाच आता त्यांना राज्याचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेल्या डी.शिवानंदन यांच्यासारखा डॅशिंग अधिकाऱ्याचाच पाठिंबा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्याच्या फोनवरून महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकावले. त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा नशा करतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरूनही अजितदादांवर प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. एकंदरीतच माढ्यातील ‘त्या’ व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीला नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे.
माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरुम उपसाप्रकरणी करमाळा-माढ्याच्या परिविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांनी कारवाई केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा-करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला होता. त्या फोनवरून डीवायएसपी कृष्णा आणि अजित पवार यांच्यात चकमक झाली होती.
महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरवर्तन केल्याचा मुद्दा तापला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी तर टीकेची झोड उठवलीच आहे,शिवाय सोशल मीडियावर अजित पवारांच्या गैरवर्तनाच्या कृतीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.