Mumbai News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात समाजवादी पक्षाची पुरती कोंडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरूवातीला 12 आणि आता पाच जागांची मागणी करत पक्षाने आघाडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुंबईत येऊन सूचक इशाराही दिला आहे. तर प्रदेशाध्यक्ष अबू आझमी असूनही पाच जागांवर ठाम आहेत.
अबू आझमी हे मुंबईतील मानखूर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे. या मतदारसंघासह त्यांनी भिवंडीतील दोन, जळगाव आणि मालेगांवमधील एका जागेची मागणी केली होती. पण आघाडीने त्यापैकी तीन मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याने समाजवादी पक्षाची कोंडी झाली आहे.
उरलेल्या दोन जागांवर अद्याप आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामध्ये मानखूर्द-शिवाजीनगर आणि भिवंडीतील एका जागेचा समावेश आहे. त्यामुळे हो दोन मतदारसंघही तरी आपल्या वाट्याला येतील, अशी त्यांना आशा आहे. पण आझमी यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांनी लढण्याचा निर्धार केला आहे.
अद्याप महायुतीने या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही. मलिकांनी अर्ज दाखल केल्यास युतीकडून त्यांना छुपा पाठिंबा मिळू शकतो, अशीही चर्चा आहे. त्यामुळे मलिक विरुध्द आझमी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. अजूनही आघाडीने या मतदारसंघाबाबत अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुन्हा विजयी होण्यासाठी आझमींना आघाडीची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आघाडीकडून भाव मिळत नसतानाही त्यांना मनधरणी करावी लागत आहे.
दरम्यान, आझमी यांनी एक ट्विट करत आघाडीला पुन्हा सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण यावेळी त्यांचा सूर मवाळ झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. आघाडीने निर्णय न घेतल्यास 25 जागांवर उमेदवार उभे करू, असा इशारा त्यांनी दिला होता. आता त्यांनी जिथे आमची ताकद आहे तिथे आणि आघाडीला नुकसान होणार नाही, अशाच मतदारसंघात उमेदवार उभे करू, असे भूमिका घेतली आहे. त्यामुळे आझमींवरच दबावतंत्राचा डाव उलटल्याची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.