मुंबई : राज्यसभा निवडणूक घडामोडींना सध्या वेग आला आहे. अशातच राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. यामुळं त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती मोर्चा मैदानात उतरला आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, यासाठी सर्वच पक्षातील मराठा आमदारांची मोर्चा भेट घेणार आहे.
मोर्चाचे समन्वयक करण गायकर म्हणाले की, संभाजीराजेंनी खासदार असतांना कामे केली असू,न त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळावी. गडकिल्ले संवर्धनासह कोपर्डी प्रकरणात आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले. सगळे शाहू, छत्रपती यांचे नाव घेतात आणि राजकारण करतात. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देत त्यांना बिनविरोध निवडून द्यावे. अपक्ष आमदारांना कोणी घाबरविण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेकडून आम्हाला अपेक्षा आहे ती त्यांचा सन्मान ठेवेल. आम्ही मराठा आमदारांना भेटून आमची भूमिका मांडणार आहोत.
संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपसह सगळ्यांनी संभाजीराजेंना बिनविरोध निवडून द्यावे. त्यांना बिनविरोध निवडून देण्याची संधी सगळ्या पक्षांना आली आहे. सहाव्या जागेसाठी कुणाकडेही बहुमत नाही. पक्षीय आवेश न आणता संभाजीराजेंना निवडून आणावे. संभाजी राजेंच्या उमेदवारीबाबत कोणाचा आकस असेल तर सातवा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न होईल. प्रियांका चतुर्वेदी परप्रांतीय असून, त्यांना जागा दिली जाते मग संभाजीराजेंना का नाही?
राज्यसभेच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येऊ शकतो. त्यामुळे उर्वरित सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून सहावी जागा शिवसेना लढविणार असल्याचे मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे.
सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांनी यापूर्वी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना लढविणार असल्याने शिवसेनेने उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वीच संभाजीराजे यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती, ती ऑफर अद्यापही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. याच ऑफरच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाल्याची चर्चा होती. (Rajysabha Election latest news)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.