
Mumbai News : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलन चांगलंच गाजलं. याचबरोबर आंदोलनकाळात मराठा आंदोलकांचा सीएसटीवरचा दंगा, कारंजात केलेली अंघोळ, सिग्नलवर चढणं, पोलिसांसोबतची अरेरावी असो किंवा रस्त्यावर खेळणं, हुल्लडबाजी असे एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याचदरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना खासदाराने थेट सीएम फडणवीसांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहित यापुढे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. पण चौफेर टीकेनंतर आता खासदारांनी आपल्या मागणीवरुन यू टर्न घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार मिलिंद देवरा यांनी आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली होती. मात्र, त्यांच्या पत्रावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे. यावेळी त्यांनी शिस्तबद्ध आंदोलनासाठी हे पत्र होतं, अशी भूमिकाही स्पष्ट केली आहे.
शिवसेना पक्षाचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पु्न्हा ट्विट केलं आहे.या ट्विटमध्ये ते म्हणतात, मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की, आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो याचा मला अभिमान असल्याचंही म्हटलं आहे.
देवरा म्हणाले, माझे मुख्यमंत्री यांना पाठवलेले पत्र हे मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हते, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी असल्याचा खुलासाही त्यांनी ट्विटमधून केला आहे.
मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या टीकेवरही जोरदार प्रत्युत्तर दिले. मी सांगू इच्छितो की, दररोज किमान दोनदा खोटं बोलणार्या, मानसिक उपचारांची तातडीने गरज असलेल्या, बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी, माझं पत्र नीट वाचण्याचा खोचक सल्लाही देवरा यांनी राऊतांना दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षावर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा असल्याचा हल्लाबोलही केला होता.
तसेच मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय मागण्यांसाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना लिहिले.पण अगोदर त्यांच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करावं, अशी टीका राऊतांनी केली होती.
शिवसेना पक्षाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात आझाद मैदानासारख्या ठिकाणी आंदोलनांना परवानगी देणं योग्य नाही. कारण, हे ठिकाण केवळ एक मैदान नाही, तर संपूर्ण दक्षिण मुंबईच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक भागाचा केंद्रबिंदू आहे.
तसेच आझाद मैदानाला लागूनच मुंबई महानगरपालिका उभी आहे, ती देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. समोरच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, जिथून दररोज लाखो प्रवासी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करतात, असंही पत्रात देवरा यांनी म्हटलं होतं.
मैदानाच्या अगदी जवळच मुंबई हायकोर्ट आहे, तर काही अंतरावर मंत्रालय आहे, जिथून महाराष्ट्राचं राज्यकारभार चालतो. याशिवाय आरबीआयचं मुख्यालय, मुंबई पोर्ट, आणि मंत्र्यांची मलबार हिलवरील निवासस्थाने ही महत्त्वाची केंद्रं याच परिसरात आहेत. या सगळ्या दृष्टीकोनातून, सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आझाद मैदान आंदोलनांसाठी योग्य ठिकाण नाही, असं मत मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.