मुंबई : भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र पाठवलं आहे. राज ठाकरे (raj thackeray)यांच्या पत्रातून फडणवीस यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या पत्रात राज यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतले म्हणून कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. (raj thackeray latest news)
"आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं", अशा शब्दांत राज ठाकरेंनी फडणवीसांची स्तुती केली.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात भाजप सत्तेत यावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात..
प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबादारी स्वीकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन! वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो... तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केले. आताचं सरकार आणण्यासाठी देखील तुम्ही अपार कष्ट उपसलेत. इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष,पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे.ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरंचं अभिनंदन!
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.