

Mumbai Municipal Corporation : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणानंतर मुंबई महापालिकेच्या नागरी सेवा केंद्रांमधील जन्म दाखले देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर संथ झाल्याचा मुद्दा पालिका सभागृहात चर्चेला आला. जन्म दाखला मिळण्यासाठी किंवा त्यामधील दुरुस्तीसाठी सहा महिने ते वर्षभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सर्वपक्षीय सदस्यांनी नमूद केले.
दरम्यान, 19,800 जन्म प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मुंबईतून (Mumbai) परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचेही सभागृहात सांगण्यात आले. काही सदस्यांनी पैसे देणाऱ्यांना प्रमाणपत्रे लवकर मिळत असल्याचे आरोपही उपस्थित केले.
भाजपचे (BJP) नगरसेवक डॉ. नील सोमय्या यांनी विशेष ठरावाच्या सूचनेद्वारे मुंबईतील काही भागांत परदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य वाढत असल्याचा तसेच काही विभाग कार्यालयांतून बोगस जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप केला. जन्म नोंदणी, प्रमाणपत्र वितरण, अभिलेख व्यवस्थापन आणि नियमांच्या अंमलबजावणीची स्वतंत्र तपासणी करून प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात प्रामाणिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. अजंता यादव यांनी जन्म दाखल्यांतील दुरुस्तीसाठी सहा महिने ते वर्षभर विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी एसएपी (SAP) प्रणालीद्वारे जन्म दाखले देण्याची प्रक्रिया बंद असल्याचे सांगत याबाबत तातडीने धोरण निश्चित करण्याची मागणी केली.
पालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी सुमारे 19,800 जन्म प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. बनावट प्रमाणपत्रांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.