Mumbai North Lok Sabha Constituency
Mumbai North Lok Sabha ConstituencySarkarnama

Mumbai North LokSabha Constituency : नगरसेवक ते खासदार बनलेल्या गोपाळ शेट्टींना उत्तर मुंबईतून हॅटट्रिकची संधी!

Mumbai Political News : गोपाळ शेट्टी यांचे मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असून, बहुभाषिक उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे.
Published on

Lok Sabha Election 2024 : उद्यानसम्राट, जनतेत मिसळून काम करणारा लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांना ओळखले जाते. एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले गोपाळ चिनय्या शेट्टी 1992 मध्ये प्रथम नगरसेवक झाले होते. नंतर महापौर परिषदेत मुंबई शहराचे पहिले उपमहापौर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. अल्पशिक्षित असलेल्या गोपाळ शेट्टी यांचे मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांनी तीन टर्म नगरसेवक म्हणून, दोन वेळा बोरिवली मतदारसंघातून आमदार म्हणून आणि आता सलग दोन टर्म (2014 आणि 2019) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

शांत स्वभावाचे गोपाळ शेट्टी हे एक लोकप्रिय राजकारणी आहेत. स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित असलेल्या सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्याला त्यांचे प्राधान्य असते. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात क्रीडांगणे, उद्याने, फिटनेस आणि वैद्यकीय केंद्रे विकसित केली आहेत. (Latest Marathi News)

Mumbai North Lok Sabha Constituency
मुंबई पोलिसांच्या समन्सला शुक्ला यांचे उत्तर; चौकशीची खूपच घाई असेल, तर....

याशिवाय लोकसभेत खासगी सदस्य विधेयक मांडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी लोकसभेत पालकांच्या समंतीशिवाय मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याचे खासगी विधेयक मांडले होते. तसेच संसदेच्या सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर 'भारतमाता की जय' म्हणणे अनिवार्य करण्याचे विधेयकही त्यांनी मांडले होते. नगरसेवक ते खासदार झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत राज्यात सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम केला आहे. दरम्यान, 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास गोपाळ शेट्टी यांना आता हॅटट्रिक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Mumbai North Lok Sabha Constituency
 कर्जवसुलीसाठी दडपशाहीचा मार्ग?, गोपाळ शेट्टी यांचा संताप 

नाव (Name)

गोपाळ चिनय्या शेट्टी

जन्मतारीख (Birth date)

31 जानेवारी 1954

शिक्षण (Education)

नॉन-मॅट्रिक

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

गोपाळ शेट्टी यांचे कुंटुब मूळचे कर्नाटकातील मंगळुरूचे आहे. मुंबईत गिरणीकाम करणाऱ्या चिनय्या शेट्टी यांच्या कुटुंबात गोपाळ शेट्टी यांचा जन्म झाला. गोपाळ शेट्टी यांचे वडील चिनय्या शेट्टी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांचा भाजपकडील प्रवास हा संघापासूनच झाला. तसेच लहानपण झोपडपट्टीत गेलेल्या गोपाळ शेट्टी यांना तेव्हापासूनच जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याची सवय लागली होती. गोपाळ शेट्टी यांच्या मातुःश्रींचे नाव गुलाबी शेट्टी असे आहे. गोपाळ शेट्टी यांच्या पत्नीचे नाव उषा शेट्टी असे आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

राजकारण आणि व्यवसाय.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

उत्तर मुंबई.

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भारतीय जनता पक्ष.

Mumbai North Lok Sabha Constituency
झोपडीवासीयांसाठी तातडीने प्रकल्प उभारावेत: गोपाळ शेट्टी 

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

शेट्टी हे जवळपास तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. शेट्टी यांनी सुरुवातीला 1992 मध्ये मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे त्यांच्याकडे मुंबईच्या उपमहापौरपदाचीही जबाबदारी आली होती. त्यानंतर 2004 मध्ये भाजपने त्यांना बोरिवली मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ते विजयी झाले. 2009 च्या निवडणुकीतही शेट्टी यांनी आमदारकी कायम राखत विधानसभेत बोरिवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदारकाच्या काळात त्यांनी विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम पाहिले. दरम्यानच्या काळात गोपाळ शेट्टी यांना भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पुढे 2014 निवडणुकीत भाजपने त्यांना मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रसेचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्या निवडणुकीत शेट्टी यांना 6,64,004 मते मिळाली होती. 2014 मध्ये राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले ते खासदार ठरले होते. 2019 च्या निवडणुकीतही शेट्टी हे राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांना एकूण 7,06,678 मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा तब्बल 4,65,247 मतांनी पराभव केला होता. मातोंडकर यांना 2,41,431 मते मिळाली होती. आगामी निवडणुकीतही भाजपकडून गोपाळ शेट्टी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेट्टी यांना आगामी निवडणुकीत आपल्या खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

Mumbai North Lok Sabha Constituency
गोपाळ शेट्टींचा भाजपला घरचा आहेर, म्हणाले ".तर मी राजीनामा देईन";पाहा व्हिडिओ

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

गोपाळ शेट्टी यांना उद्यानसम्राट म्हणून ओळखले जाते. नगरसेवक ते खासदार झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी आपल्या मतदारसंघात मोकळ्या जागेत झोपडपट्टी वाढू न देता त्या ठिकाणी क्रीडा मैदाने आणि उद्यानांचा विकास केला आहे. पोयसर जिमखाना, राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या विकासाचे श्रेय गोपाळ शेट्टी यांनाच जाते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. गरजूंना आर्थिक मदत करण्यात त्यांचा हात नेहमीच पुढे असतो, अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात असते. संसद आदर्श ग्राम योजनेतून त्यांनी पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे गावाचा कायापालट केला आहे. कोरोनाकाळात त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यासाठी त्यांनी मदत केली होती.

गोपाळ शेट्टी हे मतदारसंघात सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. दररोज सकाळी आठ वाजता त्यांचा जनता दरबार भरलेला असतो. त्यात ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात. याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे कामही शेट्टी आपल्या मतदारसंघात नियमित करतात. गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला होता. त्यांच्या मतदारसंघातील हजारो कुटुंबीयांना मोफत पाइप गॅस कनेक्शन दिले होते. मतदारसंघात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, गरजूंना अन्नदानही करतात.

Mumbai North Lok Sabha Constituency
South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ कुणाचा? ठाकरे अन् काँग्रेस आमने-सामने!

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

गोपाळ शेट्टी यांनी 2019 मध्ये उत्तर मुंबई या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा तब्बल 4,65,247 मतांनी पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास हा त्यांनी केलेल्या विकासकामाला जनतेने दिलेली पोचपावती होती. सुरुवातीला 2014 मध्ये ते खासदार झाले, त्यावेळी मोदीलाट होती. त्यावेळी त्यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता. मात्र त्यावेळीही ते त्यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामांना समोर ठेवूनच मतदारांना सामोरे गेले होते. उद्यानसम्राट म्हणून ओळख असलेल्या शेट्टी यांच्या कार्याची दखल घेत मतदारांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणले होते. तीच पुनरावृत्ती 2019 मध्येही झाल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसकडे गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत देईल, असा तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यातच काँग्रेसने 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्या ऊर्मिला मातोंडकर यांना तिकीट दिले होते. मात्र ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्या एक कलाकार होत्या. तेवढीच काय ती त्यांची ओळख होती. मात्र शेट्टी यांच्या मतदारसंघातील कामापुढे मातोंडकर यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य हे शून्यच होते. शिवाय शेट्टी हे जनतेमध्ये मिसळून काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला.

Mumbai North Lok Sabha Constituency
Pune LokSabha Bye Election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम स्थगिती; कोर्टाने म्हटलं...

या मतदारसंघात मराठी, हिंदी आणि गुजराती मतदारवर्ग मोठा आहे. शेट्टी यांचे या तिन्ही भाषांवर प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आणि एक जवळीक साधण्यासाठी फायदा झाला. ते मुंबईत असतील तर त्यांच्या कार्यालयात सकाळी आठपासून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू करतात. भाजपची प्रभावी प्रचारयंत्रणा, केंद्रातील मंत्र्यांची प्रचारात उतरलेली फौज यामुळे शेट्टी यांचा विजय सुकर झाला. दुसरीकडे ऊर्मिला मातोंडकर या एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांच्याकडे विकासकामांच्या आधारावर प्रचार करण्याची संधी नव्हती. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचाही मातोंडकर यांना फटका बसल्याची चर्चा होती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

गोपाळ शेट्टी हे राजकारणात येण्याआधीपासून जनतेच्या कामांसाठी झटत होते. जमिनीवर राहून काम करणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शिवाय त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेवक म्हणून केली. त्यानंतर त्यांना खासदारकीपर्यंतचा प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा दिवसेंदिवस विस्तारत गेल्या. त्यांचा डाय बनवण्याचा व्यवसाय आहे. त्या व्यवसायाच्या माध्यमातूनही ते जनतेशी जोडले गेलेले आहेत. शेट्टी यांच्याकडे लोक राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि प्रसंगी खासगी समस्याही मांडतात. त्यामुळे जनतेमध्ये एक आपला हक्काचा असा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यातूनच मतदासंघात त्यांचा जनसंपर्क किती दांडगा आहे, याचा अंदाज येतो.

Mumbai North Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha Seat : सांगली लोकसभा काँग्रेसकडेच; चव्हाणांनी उमेदवारही केला जाहीर!

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

खासदार शेट्टी यांचा सोशल मीडियाचा वापर प्रभावी आहे. त्यांची सोशल मीडिया टीम त्यांच्या कामांना विविध प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्धी देण्याचे काम करीत असते. शेट्टी यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, सरकारी योजना यांसह भाजपच्या ध्येयधोरणांची माहिती सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली जाते. शेट्टी यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

2016 मध्ये जलयुक्त शिवार या योजनेवर बोलत असताना शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईवरून एक वादग्रस्त विधान केले होते. सगळेच शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण बेरोजगारी आणि उपासमारी नाही, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची एक फॅशनच झाली आहे, वेगवेगळ्या राज्याच्या सरकारमध्ये ही स्पर्धा लागली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार शेट्टी यांनी केले होते. यावेळी काँग्रेससह राज्यातील शेतकरी शेट्टी यांच्याविरोधात आक्रमक झाले होते. त्यानंतर शेट्टी यांनी माफी मागितली होती. त्याचप्रमाणे शेट्टी यांनी 2018 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना ख्रिश्चन हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने निवेदन सादर करीत ते शेट्टी यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. त्यावेळीही शेट्टी यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

राम नाईक.

Mumbai North Lok Sabha Constituency
NCP News: 'जशास तसं उत्तर' कसं द्यायचं यासाठी अजित पवार गट सज्ज !

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

गोपाळ शेट्टी हे भाजपचे कट्टर समर्थक आणि विकासाला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांची कोणतीही समस्या लहान न मानता ती सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळेच उत्तर मुंबईमधील मतदार पक्ष न बघता व्यक्ती आणि त्यांचे कार्य पाहून मतदान करीत असल्याचे आजपर्यंतच्या त्यांच्या विजयाने अधोरेखित झाले आहे. येथील मतदारांचा गोपाळ शेट्टी यांच्यावर मोठा विश्वास आहे. याशिवाय भाजपचे संघटनात्मक नेटवर्क अधिक मजबूत आहे. गोपाळ शेट्टी यांचा प्रवास नगरसेवक, आमदार आणि खासदार असा आहे. त्यांनी मतदारसंघात विकासाचे राजकारण केले आहे. सद्यःस्थितीत उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मालाड पश्चिम या मतदारसंघातून अस्लम शेख आणि मागाठाणेमधून शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे आमदार सोडले तर मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, त्यांच्याविषयी नकारात्मक मुद्दे नाहीच्या बरोबरच आहेत. मात्र सध्याचे भाजपचे धक्कातंत्राचे धोरण गोपाळ शेट्टीसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीसाठी आता या मतदारसंघातून भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तसे झाले तर शेट्टी यांना पक्षाच्या निर्णयापुढे माघार घ्यावी लागणार आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

सद्यःस्थितीत उत्तर मुंबई या भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात गोपाळ शेट्टीचे गुण मूल्यांकन चांगले आहे. त्यामुळे पक्षाने धक्कातंत्राचा वापर न केल्यास शेट्टी यांना खासदार म्हणून हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र, सध्या भाजप या मतदारसंघात उमेदवाराचा चेहरा बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून या ठिकाणी विनोद तावडे यांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शेट्टी यांना पक्षादेश पाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संधी मिळावी, यासाठी शेट्टींकडून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न निश्चितच केले जातील. त्यातूनही तिकीट कापल्यास मनात नसतानाही शेट्टी यांना पक्षाचा आदेश पाळत पक्षाने तिकीट दिलेल्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com