Jalgaon News: लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर राजकीय नेत्यांच्या इनकमिंग आणि आऊटगोईंगही सुसाट होण्याची शक्यता आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या असतानाच आता अजित पवारांचा खंदा समर्थक असलेला बडा नेता आणि शिंदे सरकारमधील विद्यमान मंत्री भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटातील चार ते पाच आमदारांनी गुरुवारी(ता. 27 जून) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जयंत पाटील हे अधिवेशनासाठी विधिमंडळात आल्यानंतर अजित पवार गटातील चार ते पाच आमदारांनी त्यांची एका खोलीत भेट घेतल्याची माहिती आहे.
त्यातच पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागातील आमदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे धाकधूक वाढली असतानाच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते डॉ.सतीश पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडवून दिली आहे.
जळगाव येथे नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंथन आणि चिंतन बैठक झाली. त्या बैठकीत डॉ.सतीश पाटील यांनी राज्याचं राजकारण हादरवणारं विधान केलं आहे. अजित पवारांना सर्वात आधी कोण सोडून जाणार असेल तर ते मंत्री अनिल पाटील,असा दावा त्यांनी केला आहे.
माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील म्हणाले, भाजपमध्ये माझे थोडे फार संबंध आहेत.त्यानुसार एका मोठ्या नेत्याने अनिल पाटील (Anil Patil) भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती दिली असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.यावेळी त्यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांची मंत्री अनिल पाटील यांनी घेतलेल्या भेटीचा संदर्भही दिला.
अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे सी.आर.पाटील यांच्यामार्फत भाजपमध्ये जाण्याची लाईन लावत आहेत.पण भाजपच्या लोकांनी त्यांना अजितदादांना सोडून निवडणूक लढवावी लागेल असं स्पष्टपणे सांगितलं असल्याचेही सतीश पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.