Mumbai News : राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरातून 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 44 जण भाजपचेच आहेत. मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने चर्चा सुरु असतानाच आता पनवेल महानगरपालिका निवडणुकीतील नाट्यमय घडामोडी पुढे आल्या आहेत. पनवेल नगरपालिका निवडणुकीत 7 जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये याठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने याठिकाणी भाजप आमदाराची बहीण विजयी झाली आहे. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यातच आता पनवेल महापालिका निवडणुकीत वेगळंच राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यभरात भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधातील उमेदवार माघार घेत असताना पनवेलमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. यामुळे भाजप आमदाराची बहीण विजयी झाली आहे. त्या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या.
पनवेल महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 क मध्ये नाट्यमय घडामोड घडली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नेते विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल ढमाले पाटील विजयी झाल्या. विक्रांत पाटील भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे आमदार विक्रांत पाटील यांची बहीण स्नेहल ढमाले या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होत्या. स्नेहल ढमाले-पाटील यांच्या बिनविरोध निवडीने एकीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. त्यामुळे या निवडणुकीत घराणेशाहीला लगाम घालण्यासाठी पक्षाने हे धोरण आखले होते. पण आमदार विक्रांत पाटील यांनी तरीही त्यांच्या बहिणीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आता त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारालाच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला लावली. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
या निवडणुकीत माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार स्नेहा ढमाले यांच्या बिनविरोध निवडीने भाजपला धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप स्थानिक पातळीवर आमदार पाटील यांच्यावर होत आहे. यासंदर्भात भाजपमधील निष्ठावानांचा गट आक्रमक झाला आहे. त्यांच्याकडून आमदार विक्रांत पाटील यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे याठिकाणचे वातावरण चांगलेच तापले आहे.
पनवेल महापलिका निवडणुकीत भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेलमध्ये 2017 मध्ये अखेरची निवडणूक झाली. त्यावेळी महापालिकेत भाजपचे 51 उमेदवार विजयी झाले होते. एकूण 78 जागा असलेल्या महापालिकेत भाजपनं अगदी स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. भाजपच्या खालोखाल जागा शेतकरी कामगार पक्षानं 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.