Mumbai News, 27 Nov : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार पार्थ पवार यांच्याकडून नव्या फळीची बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत नव्या चेहऱ्यांना संधी देताना पार्थ पवार यांच्या जवळच्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.
नुकतंच राष्ट्रवादीत आलेल्या अर्जुन मेघे यांच्याकडे मुंबईतील युवक संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अर्जुन मेघे यांनी पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अल्पावधीतच त्यांना महत्त्वाचे पद मिळाल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांच्यासारख्या नेत्यांनाही खासदार पार्थ पवार यांच्याकडून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.
अर्जुन मेघे यांची राजकीय पार्श्वभूमी भाजपशी संबंधित आहे. ते भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष होते. तसेच माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे ते चिरंजीव आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. आता त्यांच्याकडे मुंबईतील युवक संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या काही नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत मतभेद समोर आल्याची चर्चा होती. आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई युनिटच्या अध्यक्षपदी, तर सोलापूरचे उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयांची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली होती. या नियुक्त्यांबाबत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
अशातच आता मुंबई युवक अध्यक्षपदाची जबाबदारीही पार्थ यांच्या पसंतीच्या नेत्याकडे गेल्याने पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे अर्जुन मेघे यांच्या नियुक्तीला पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.