

Rahul Gandhi Protest : राजकीय आंदोलनांच्या माध्यमातून घटनात्मक संस्थांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चावरून शिंदे यांनी विरोधकांना धारेवर धरले. न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी घातक असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी १४० कोटी भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
संविधानाचे पुस्तक हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा विरोधाभास असल्याचे शिंदे म्हणाले. न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाबाबत आक्षेप असल्यास याचिकेद्वारे दाद मागण्याची व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर उतरून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य नाही. संविधानाच्या रक्षणाची भाषा करणाऱ्यांनी घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेचेही भान ठेवले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
या प्रकरणाला केवळ राजकीय आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता एकनाथ शिंदे यांनी परकीय शक्तींच्या संभाव्य हस्तक्षेपाचाही मुद्दा उपस्थित केला. भारताला बलवान होऊ द्यायचे नाही, अशी भूमिका घेणाऱ्या शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा शक्तींच्या प्रभावाखाली काही जण काम करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत या घटनांमागे आंतरराष्ट्रीय कटकारस्थान असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
तर राजकीय विरोध असणे वेगळे आणि देशाच्या सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करणारी भाषा वापरणे वेगळे, असे ते म्हणाले. दिल्ली पोलिसांबाबतही विरोधकांनी केलेल्या वक्तव्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. विरोधकांच्या काही वक्तव्यांना पाकिस्तानमधील माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळते, याकडे लक्ष वेधत शिंदे यांनी देशविरोधी शक्तींना अशा विधानांचा फायदा होत असल्याचा आरोप केला.
पंतप्रधान मोदी यांना ३६ देशांनी सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले असताना विरोधकांना त्याचा त्रास का होतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका देशाच्या हिताची नसल्याचे सांगत शिंदे यांनी या मोर्चाचा तीव्र शब्दांत निषेध केला. देशातील लोकशाही आणि घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षांची असल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.