

Mumbai News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही दिवसांपूर्वीच सहा खासदार फुटले होते. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणालाच मोठा धक्का दिला आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंचे विश्वासू नेते म्हणून ओळख असलेल्या आमदार सचिन अहिर यांना महायुतीतील शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली. यानंतर एकनाथ शिंदेंसोबतच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आमदार सचिन अहिर यांनी मोठी गुगली टाकली आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.30) एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. तर अहिर यांनी मात्र सावध भूमिका घेत आपला पत्ता ओपन केलाच नसल्याचं दिसून आलं.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करुन शिवसेनेत दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे यापुढे अगदी जोमानं काम करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तसेच भविष्यकाळात शिवसेना पुणे, मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आणखी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इरादाही अहिर यांनी बोलून दाखवला.
तसेच एकीकडे विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज शिवसेनेकडून दाखल केल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाजूला बसले असतानाही त्यांनी केलेलं एक विधान चर्चेचं विषय ठरत आहे. अहिर यांनी पक्ष सोडलाच नसल्याचं विधान करत गुगली टाकली.
विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी पक्ष सोडला नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. तांत्रिक मुद्द्यावर वेगळ्या व्यासपीठावर बोलू असं त्यांनी सांगत अतिघाईने ठाकरेंवर निशाणा साधण्याचं सध्यातरी टाळल्याचं दिसून येत आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांची तात्काळ बाजू घेतली. ते म्हणाले, ज्यावेळी सचिन अहिर हे आमदार झाले, त्यावेळी आम्हीच त्यांना मतदान केलेलं होतं. ते आमदार झाले, तेव्हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह होतं. आज हे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला वगैरे म्हणता येणार नाही, असा तांत्रिक मुद्दा एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
सचिन अहिर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी दिलेली आहे. हा माझा बहुमानच आहे. या पदाचा मान ठेवून मी भविष्यात काम करणार आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन काम करत आहेत. ते आकर्षण आहेत. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा ते याबाबत सांगतील.
असा नेता आम्हाला साथ देणार असेल तर काम करता येते, असंही त्यांनी बोलून दाखवलं. तसेच समोरुन हळूहळू टीका होण्यास सुरूवात झाली आहे. त्यांना वेगळ्या व्यासपीठावरुन उत्तर देईन असंही अहिर यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे शेजारी असतानाही त्यांनी ठाकरेंवर आगपाखड करताना हात आखडता घेतल्याचं पाहायला मिळालं. पण यावेळी त्यांनी काही लोकांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं, असा चिमटा ठाकरेंना काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.