Andhare Counterattack to Fadnavis : अंधारेंचा फडणवीसांवर पलटवार; ‘तुमच्या पक्षातल्या एक बाई...त्याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटलं नाही’

Devendra Fadnavis Assembly Speech : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक कविता वाचून दाखवली होती, तीच कविता पुन्हा म्हटल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे नाव न घेता विधानसभा सभागृहाच्या सन्मानावरून टीकास्त्र सोडले होते.
Devendra Fadnavis-Sushma Andhare
Devendra Fadnavis-Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 March : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक कविता वाचून दाखवली होती, तीच कविता पुन्हा म्हटल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे नाव न घेता विधानसभा सभागृहाच्या सन्मानावरून जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्या सभागृहात एसएम जोशी, कॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, यांच्यासारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचं, त्या सभागृहात नीतेश राणे, चित्रा वाघ, संजय शिरसाट यासारख्या लोकांनी त्याचं पावित्र्य हरवून टाकलंय, याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी? असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.

कुणाल कामराच्या एका शोमुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळले आहे. शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यानी कामराचा शो चित्रीकरण झालेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. विधानसभेत त्यावर चर्चा झाली होती, तसेच दिवसभर त्यावरून आरोप प्रत्यारोप रंंगल आहेत. तीच कविता म्हणताचा व्हिडिओ सुषमा अंधारे (SushmaAndhare ) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावरून फडणवीसांनी आज विधानसभेत अंधारेंवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करत फडणवीसांवर पलटवार केला आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रती श्रीयुत देवेंद्र गंगाधरजी फडणवीस (Devendra Fadnavis), मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य सस्नेह नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की, आज पुन्हा सभागृहात आपण माझ्यावर बोललात. पण आपल्याला उत्तर द्यायला मी सभागृहात नाही. ही माझी तांत्रिक अडचण आहे. म्हणून आपल्याला या पत्राद्वारे उत्तर देणे माझी जबाबदारी आहे.

तसे सभागृहात आपण पहिल्यांदा माझ्याबद्दल बोललेला नाहीत. आपल्यासह या सभागृहातल्या भल्या भल्या सदस्यांनी याआधीही माझ्यावर बोलून ‘आपण कालबाह्य झालेलो नाहीत; आपली उपयोगीता अजूनही शिल्लक आहे हे’ हे आपापल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांचे लागूनचालन करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही अंधारे यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Fadnavis Angry in Assembly : ...त्याचा अर्थ सभागृहात बसलेल्या 288 लोकांची काय औकातच नाही; ठाकरेंच्या नेत्याच्या ‘त्या’ कृतीवर फडणवीस भडकले

त्या म्हणाल्या, देवेंद्रजी, आज प्रचंड पोटतिडकीने आपण सभागृहाच्या आदर सन्मानाबाबत भाष्य करत होतात. आनंद झाला अन आश्चर्यही वाटले. आनंद यासाठी की चला सभागृहाच्या मानसन्मानाबद्दल थोडी का होईना आपल्याला काळजी वाटते. अन आश्चर्य याचे की, हा सभागृहाचा मानसन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी शेकडो वेळा धुळीस मिळवला, तेव्हा आपली ही अतिसंवेदनशीलता नेमकी कुठे हरवली होती?

देवेंद्रजी, नवनीत राणाने या राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव साहेबांच्या बद्दल बोलताना ‘तुमच्यात दम आहे का’ ही भाषा वापरणं सभागृहाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा मान वाढवणारी होती की मान खाली घालणारी होती? सभागृहाचे सदस्य असणारे सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीमध्ये या शतकातला नेता म्हटलं तरी चालेल, ज्या नेत्याला आपले नेते नरेंद्र मोदीजी गुरुस्थानी मानतात, त्या पवार साहेबांच्या आजारावर अत्यंत हिनकस टिप्पणी केली तेव्हा त्यांना संस्कार सांगायला आपण का विसरलात? असा सवालही अंधारेंनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, आजच्याच वक्तव्यामध्ये संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्या बद्दल बिनलाजे शब्द वापरतात, तर परिणय फुके ह****** शब्द वापरतात हे सभागृहाच्या कोणत्या मर्यादित बसतं...? माझ्या पक्षातच सोडा पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि बीभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला 56 बांधून फिरण्याची भाषा करतात. यावर आज सभागृहात तुम्ही चकार शब्दाने ही का बोलला नाहीत ?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. या पवित्र सभागृहाचा मानसन्मान मला फार चांगला कळतो. ज्या सभागृहामध्ये एसएम जोशी, डॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, यांच्यासारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचं, त्या सभागृहात नीतेश राणे, चित्रा वाघ, संजय शिरसाट, यांसारख्या लोकांनी त्याचं पावित्र्य हरवून टाकलंय, याचं तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी? असा टोमणाही त्यांनी लगावला आहे.

देवेंद्रजी, माझ्यावर कारवाई करायची असेल तर निश्चित करावी. या देशात सत्य बोलणं, लोकाभिमुख प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी वारंवार करायला तयार आहे. पण माझ्यावर कारवाई करताना स्वपक्षीयातील थिल्लर चाळे थांबवण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहे का यावरही आपण चिंतन करावं. माझ्याकडून आपल्या प्रति कायमच स्नेहभावना आहे. ती वृद्धीगंत होऊ द्यायची की नाही याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे...! कळावे,आपली बहीण सुषमा अंधारे

ताजा कलम : बहिणीवरून आठवल, दम आहे का? पायाला 56 बांधून फिरते , असं म्हणणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ? मी सभ्यतेने प्रश्न विचारूनही नाही याचं नेमकं कारण जात–वर्ग–पैसा यापैकी काय ते कळेल का ?

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या मदतीने मी विरोधी पक्षाला ‘त्या गोष्टी’चे ट्रेनिंग देईन; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात काय म्हटलं होतं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अत्यंत खालच्या दर्जाचं वक्तव्य अथवा कविता झाली. त्या संदर्भात आपण विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल इतकी चर्चा केली. सभागृहाने त्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरिता ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता पुन्हा वाचतात. त्याचा अर्थ काय आहे. तुम्ही इथे बसलेल्या २८८ लोकांची काय औकातच नाही, हा त्याचा अर्थ आहे. प्रश्न माझा नाही किंवा ठाकरे गटाच्या त्या नेत्या कोणी मोठ्याही नाहीत, त्यांना शिक्षा करावी, अशी माझी अपेक्षाही नाही. पण, कुठेतरी या सभागृहाचा काय सन्मान आहे, या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे. अध्यक्ष महोदय मी आपल्यावर सोडतो. आपण आमचे कस्टोडियन आहात, असे सांगून सभागृहाच्या अवमानाचा विषय मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com