
Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.शनिवारी(ता.19) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती होऊ शकते, असं म्हणताना आमच्यातील भांडणं फार छोटी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही, आमच्या भांडणं छोटी, पण महाराष्ट्र मोठा आहे, असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हटले. यानंतर काहीच वेळात राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) सांगितलं.यानंतर आता काही तासांतच राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी पहिलं पाऊलही टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या प्रस्तावावर भाष्य करताना राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. आपल्याकडून भांडणं नव्हतीच,पण जे काही असतील तीही ती मिटवून टाकली, असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.पण आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा,असा इशाराही ठाकरेंनी राज ठाकरेंना दिला होता
आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर काहीच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडलवरून एक जुना फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसत असून त्यांनी स्मितहास्य करत एकमेकांना हस्तांदोलन करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच या फोटोमागेही मातोश्रीचाही संदर्भही पाहायला मिळत आहे. याच फोटोची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं असताना त्यावर राजकीय नेत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही मोठे संकेत दिले होते. ते म्हणाले, दोघेही भाऊ आहेत.काही राजकीय मतभेद झाले असतील. राज ठाकरेंचं वक्तव्य आणि मी उद्धव ठाकरेंचंही भाषण ऐकलं. महाराष्ट्र हितासाठी मी वाद मिटवायला तयार आहे,असं ते म्हणालेत. लोकसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते. वाद भांडण नाही आणि मिटवायला वेळ लागणार नसल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं.
आम्ही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत असून आम्ही सकारात्मक भूमिकेतून याकडे बघतोय, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील शूत्रंना मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असं आम्ही सांगितलं होतं. हे योग्य नाही महाराष्ट्राला परवडणारे नाही, ही भूमिका आजही आमची आहे. महाराष्ट्राचे शत्रू आमचे शत्रू अशी भूमिका कोणी घेत असेल तर आमचे स्वागत आहे. सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बोलतात वेगळं आणि करतात वेगळं...अशांना आम्ही थारा देणार नाही, हा विचार राज ठाकरेंनी करणं गरजेचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
साद प्रतिसादाची भूमिका घेतली असेल तर सकारात्मक भूमिकेतून आम्ही पाहात आहोत. राज ठाकरेंकडून चांगली भूमिका समोर आली असले तर राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले,राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे, उद्धव ठाकरेंनीही सांगितलं. आपल्याकडून भांडणं नव्हती ती मिटवून टाकली, असंही त्यांनी सांगितलं होतं. आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा,असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता.
किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं चालणार नसल्याचा इशाराही राज ठाकरेंना यावेळी उद्धव यांनी दिला.
तर दुसरीकडे मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, मला असं वाटतं. लार्जर पिक्चर बघणं गरजेचं असल्याचं मतही राज ठाकरेंनी या मुलाखतीत आवर्जून सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.