

Mumbai News: महाराष्ट्रातील बहुचर्चित नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं आहे.विधानसभेनंतर आता नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा राज्यातील नंबर 1चा पक्ष ठरला आहे. महायुतीला कौल देत मतदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही विधानसभेप्रमाणेच संधी दिली आहे. आता 288 पैकी तब्बल 221 जागा जिंकलेल्या महायुतीवर विरोधकांकडून अर्थात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून आरोपांचा पहिला हायड्रोजन बॉम्ब टाकण्यात आला आहे.
एकीकडे राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपसह महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच मतदारांचे जाहीर आभार मानन्यात येत आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे.यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी सोमवारी (ता.22) आपल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीनही नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. राऊतांनी राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीच्या या तीन प्रमुख नेत्यांनी मिळून 15 हजार कोटी रुपये उडवले असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उढवून दिली आहे.
राऊत म्हणाले,हॅट्रिक,मॅट्रिक आहे, पण नगरपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून पंधरा हजार कोटी उडवले आहेत. मतदारांना पाण्यासारखे पैसे वाटल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आम्हाला अभूतपूर्व विजय मिळाला. ही अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया असल्याचा टोलाही संजय राऊतांनी (Sanjay Raut) लगावला.
तसेच एकनाथ शिंदे बोलत आहेत, आमची शिवसेना खरी आहे.तर मग जाऊन अमित शाह यांचे पाय धुवून तीर्थ प्या. शिवसेना तुम्हाला अमित शाह यांनी दिली.ते शिवसेनेचे पुण्य खूप मोठे आहे. ते पुण्य तुम्हाला मिळत आहे. चिन्ह आणि पक्षाचा निर्णय अद्याप सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर अजून निर्णय देत नाही. कारण सुप्रीम कोर्टावर दबाव असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं.
एकीकडे न्यायालय माणिकराव कोकाटेंवर सहा तासांत निर्णय देतं आणि तिकडे 40 आमदार ज्यांनी पक्ष बदलला,त्यांच्याबाबत संविधान आणि कायद्याच्या अखत्यारित राहून अद्याप निर्णय देत नाही. आता तारीख आहे 21 जानेवारी. म्हणजे निवडणुकीनंतर. ही निवडणूक देखील तुम्ही गिळंकृत करण्याचा खोचक टिप्पणीही खासदार संजय राऊतांनी यावेळी महायुतीवर केली.
नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालातील शिवसेनेच्या दमदार कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, कमी जागा लढवूनही आम्ही जास्त जागा जिंकल्या आहेत. मविआच्या एकूण जागांची बेरीज धरली, तरी ती शिवसेनेच्या जागांपेक्षा कमी आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेटही चांगला राहिला. शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही, ती घराघरात चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे. लहान लहान शहरांमध्येही शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.
शिंदे म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांना मी धन्यवाद देतो. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जे लोक या निवडणुकीत घरी बसले होते, ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते, त्या लोकांना मतदारांनी घरी बसवले असा टोलाही लगावला. लोकांना काम करणारा नेता हवा असतो, घरी बसणारा नाही. काम करणाऱ्या नेत्यांना मतदान केले, घरी बसणाऱ्यांना घरी बसवले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते.
मी आमच्या नेत्यांना सांगितले होते की, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा, त्याप्रमाणे नेत्यांनी केले. आम्ही पक्षासाठी काम करणाऱ्या तळागळातील कार्यकर्त्यांना तिकीटे दिली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेनेही आम्हाला साथ दिली. काही ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्र, तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, पण शेवटी महायुती जिंकली आहे. हीच आमच्या कामची पोचपावती असल्याची भावनाही उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.