Thane Political News : कल्याण लोकसभा दौऱ्यात उध्दव ठाकरे यांनी दिवा शहराला ही भेट देत, तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांना ठाकरेंना गदा देत, त्यांचे स्वागत केले. ठाकरेंना गदाधारी करून काय साध्य होणार? ते मतदारांपर्यंत रणनीती कशी आखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाकरे हे दिव्यातील शाखांना भेटी देण्याबरोबर शिवसैनिकांसोबत संवाद साधणार होते. पण, दिव्यातील शाखेपैकी एकाही शाखा मिळण्यासाठी ठाकरेंना अपयश आले आहे. शिवसेनेचे काम शाखेतून चालत होते. आता शाखेशिवाय ते ऐन निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचणार कसे? ठाकरे गटाच्या उमेदवाराला कसे निवडून आणणार, याकडे हेही पाहावे लागणार आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) येणार म्हणून दिव्यातील पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली. सकाळपासूनच ठाकरे येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. अखेर त्यांचे दिव्याला पहिल्यांदा पाय लागले. यावेळी स्वागत करताना त्यांना गदा भेट दिली. या दौऱ्यात शाखा भेट आणि सैनिकांशी संवाद असा होता. सत्तासंघर्षात मात्र ठाकरेंना दिव्यातील एकही शाखा राखता आली नाही. तसेच नव्याने शाखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ठाकरेंना एका महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला भेट द्यावी लागली.
दिव्यातील पदाधिकारी ठाकरेंना दिव्यात आणण्यात यशस्वी झाले. तर त्यांनी दिव्याला वेळ दिला यामध्ये धन्यता मानत आहे. पण, शाखा निर्माण करून त्याद्वारे दिवेकरांपर्यंत पोहचण्यासाठी आता काय करणार आहेत, ते ही पाहावे लागणार आहे. नाहीतर गदा भेट देऊन ठाकरेंना गदाधारी बनविण्यात काय फायदा, असे बोलले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदित्यनंतर उध्दव ठाकरेंची भेट
दिव्याला आतापर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेली आहे. त्यांनी दिवेकरांना पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन दिले. तर उध्दव ठाकरेंनी दिव्यातील पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्यांना पाण्यात बुडवा, असे आवाहनच दिवेकरांना केले आहे.
कळव्यात ठाकरे-पवार एकाचवेळी
ठाकरेंच्या दौऱ्याचा शेवट हा कळवा खारीगाव मध्ये होणार होता. तर अजितदादा गटाने महिलांसाठी खासदार खेळ पैठणीचा ठेवला होता. त्यासाठी सुनेत्रा पवार उपस्थित राहणार होत्या. दरम्यान, कळव्यात ठाकरे आणि सुनेत्रा पवारांची एन्ट्री एकाच वेळी झाली. दोन्ही ठिकाणी गर्दी पाहण्यास मिळाली. ठाकरे शिवसैनिकांना भेट देत दौरा संपवून मुंबईला रवाना झाले. तर सुनेत्रा पवारांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.