

Diva Dumping News : दिवेकरांची डम्पिंग पासून पूर्णतः मुक्तता करण्यासाठी एकीकडे ठाणे महानगरपालिका आराखडा तयार करत आहे, पण दुसरीकडे हाच कचरा भंडार्लीवासीयांच्या माथी मारला जात असल्याची परिस्थिती आहे. भंडार्ली डम्पिंगची मुदत संपल्यानंतरही ठाणे महानगरपालिका याठिकाणी कचरा टाकत आहे. यातून निर्माण होणारी कचऱ्याची दुर्गंधी, त्यातून वाहणारे सांडपाणी यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे या भंडार्ली डम्पिंगमध्ये टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विरोधात पुन्हा एकदा ग्रामस्थ एकवटले आहेत.
शुक्रवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ग्रामस्थांसह भंडार्ली डम्पिंगची पाहणी केली.यावेळी डम्पिंग शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी दिवा येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावातील भंडार्ली येथील जागा भाडेतत्वावर ठाणे महानगरपालिकेने घेतली. या ठिकाणी घनकचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याचा ठराव करण्यात आला. पण याचवेळी ठाणे महापालिकेचा कचरा भंडार्ली ग्रामस्थांच्या माथी का ? असे विचारत या प्रकल्पाला भंडार्ली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर यांनीदेखील ग्रामस्थांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल आणि त्यातून कोणत्याही प्रकारचे प्रदुषण यामुळे होणार नाही.त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपातील या प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
फक्त वर्षभरासाठी हा प्रकल्प याठिकाणी राबविण्यात येणार होता. पण फेब्रुवारी महिन्यातच याची मुदत संपली. याला पाच महिने झाले, पण आजही याठिकाणी ठाणे महानगरपालिका कचरा गाड्या रिकाम्या करत आहेत. कचऱ्याचा डोंगरच साचल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पावसाचे पाणी कचऱ्यात मिसळून सांडपाण्याचे लोटच्या लोट वाहू लागले आहेत. नागरिकांच्या घरात, शेतात हे सांडपणी गेल्याने नुकसान होत आहे.
वायू आणि जल प्रदूषणाबरोबरच कचऱ्यावर घोंगावणाऱ्या माशांचे प्रमाण एवढे वाढले आहे. एकंदरीत आरोग्याची समस्या पाहता ग्रामस्थांनी हे डम्पिंग प्रकल्प बंद करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. इतकेच नव्हे तर, शनिवारपासून घंटागाड्यांनाही त्या ठिकाणी जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. ठाणे जिल्ह्यात शिंदे सरकारला या विषयी कोणतेही सहकार्य करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातच होणाऱ्या विरोधाला शिंदे सरकार काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.
या डम्पिंगमुळे शेती, मासेमारीवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यावरच आमची रोजी रोटी आहे. या डम्पिंगमुळे बोअरवेल, विहिरींचे पाणी खराब झाले आहे. सरकारसोबत हा डम्पिंग नसून एक प्रकल्प असल्याचे सांगितले गेले. पण आज परिस्थिती पाहता आम्ही नरक यातना भोगत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता आमची या नरकातून सुटका करावी, अशी मागणी कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
मी असं म्हणेल की आमची चूक झाली. ठाण्यात बैठक झाली तेव्हा तेव्हा आम्ही डम्पिंगला होकार दिला तीच आमची चूक झाली. कारण आम्ही सुद्धा आता 30 ते 32 वर्ष या नेत्यांजवळ काम करतोय तीच आमची चूक झाल्याची खंत माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.