Mumbai, 19 November : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. तावडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, विरारमधील घटनेसंदर्भात खुलासा करण्यासाठी तावडे यांनी आज (ता. 19 नोव्हेंबर) सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, तावडे यांनी नियोजित पत्रकार परिषद रद्द केली असून त्या मागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनी आपल्या ‘एक्स अकाउंट’ वरून पत्रकार परिषद रद्द होण्याचे कारण दिले आहे. विरार येथील प्रकारानंतर मला निवडणूक आयोगाकडून पोलिसांच्या मार्फत एक सूचना मिळाली आहे. निवडणूक आयोगाने मला पत्रकार परिषद घेण्यास मनाई केली आहे, त्यामुळे मुंबईतील नालासोपारा प्रकरणी माहिती देण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद मी रद्द केली आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी आपल्या ‘एक्स अकाउंट’ वरून दिली आहे.
दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरार येथील एका हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना पैशासह पकडले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीकडून भाजपवर चोहोबाजूंनी हल्ला चढवला जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनीही तावडे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनीही ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.
पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर विनोद तावडे यांनी आपली बाजू मांडण्यासाठी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तावडे हे आपली बाजू महाराष्ट्रासमोर मांडणार होते. मात्र दिल्लीतून केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिसांच्या माध्यमातून विनोद तावडे यांना सूचना केली असून तावडे यांनी माध्यमांशी बोलू नये, असे त्यांना सांगण्यात आले आहे, त्यामुळे विनोद तावडे यांनी आपली नियोजित पत्रकार परिषद रद्द केली आहे.
ठाकूरांना टीप देणारा तो नेता कोण?
दरम्यान, भाजपच्याच एका नेत्याने आपल्याला विनोद तावडे हे पैसे वाटपासाठी विरारमध्ये येत आहेत, असे हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरानंतर सांगितले होते. त्यामुळे ठाकूरांना टीप देणारा तो नेता कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.