

Mumbai : ठाकरे सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना फोडून सत्तेची 'बेरीज' करणाऱ्या आणि ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून 'वजा' केलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद हुकण्याचे कारण त्यांनीच उघड केले आहे. नव्या सत्तासमीकरणातील उपमुख्यमंत्रीपद वाट्याला आलेल्या फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या वाटपाचे राजकारण उलगडले.
आणि मला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठांचा होता असे जाहीर केले. तो तेव्हा माझ्यासाठी धक्का असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. मात्र, फडणवीसांना एवढा मोठा राजकीय 'धक्का' देणारे भाजपमधील नेमका वरिष्ठ कोण? या निर्णय़ासाठी कुणी पुढाकार घेतला याची चर्चा भाजपच्याच वर्तुळात रंगण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे सरकार पाडून शिंदेंना जवळ करीत स्थापन केलेल्या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतील असे चित्र होते. त्यावरुन फडणवीस समर्थकांनी सोशल मीडियावर वातावरणही तापवले होते. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले गेले. परंतू, नव्या सरकारची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द फडणवीसांनीच मुख्यमंत्रीपदावर शिंदे बसणार असल्याचे जाहीर केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या सरकारला आपण बाहेरुन सहकार्य करणार असल्याचे फडणवीस बोलून गेले.
त्यानंतर मात्र, दिल्लीत भाजपच्या वर्तुळात चक्रे फिरली आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला गेला. तेव्हा दोघा शिंदे- फडणवीसांचा शपथविधी झाला. पण मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे का आले नाही यावर बराच खल झाला. भाजपात काही नाराजीचे सूर उमटले. फडणवीसांना राजकीय ब्रेक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ही खेळी खेळल्याची चर्चाही होती. त्यावर फडणवीसांनी अनेकदा खुलासेही केले आहेत.
परंतू, एका वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्याला उपमुख्यमंत्री करण्याचा वरिष्ठांचा असल्याचे सांगितले. त्यामुळे साहजिकच नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे. त्यात फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा पहिला निर्णय़ कोण्या वरिष्ठाचा असावा ? त्याला इतर कुणी पाठिंबा दिला याकडेही लक्ष वेधले जात आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले...?
फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा हा प्रस्ताव मीच दिला होता. माझ्या पत्रकार परिषदेत ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर चिंता, क्षोभ नव्हते. तर उलट माझा चेहरा विजयी होता. मला एक जिंकल्याचा आनंद होता. मात्र, तो माझा आनंद फार काळ टिकला नाही. कारण घरी आल्यानंतर माझ्या पक्षाने मला फोन करून उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं. आणि हा माझ्यासाठी मोठा धक्का होता.
मुख्यमंत्रीपदा(Chief Minister) वरुन उपमुख्यमंत्री होतोय किंवा खालच्या पदावर जातोय याचं दु:खं मला नव्हतं.माझ्या पक्षाने सांगितलं तर मी चपरासी व्हायलाही तयार आहे. मला चिंता याप्रकारची होती, आपण ज्या प्रकारचं राजकारण करतो; त्यानंतर लोकं काय म्हणतील, सत्तेसाठी किती हापापलेला आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला. मी मुख्यमंत्री होणार नाही, हे मी ठरवलं असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आपल्या विचाराने चालू शकेल असं शिवसेनेच्या आमदारांना वाटलं. हिंदुत्वादी विचारांच्या लोकांचा जीव सरकारमध्ये, पक्षात गुदमरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी एकनाथ शिंदें(Eknath Shinde)सोबत माझं बोलणं झालं. त्यानंतर मी पक्षाकडे गेलो आणि आता आपण सरकार बदललं पाहिजे असा प्रस्ताव मांडला. त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री केले पाहिजे असेही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.