Thane : आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात फेरबदल करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हाध्यक्षपदी संजय वाघुले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संघटनात्मक बांधणीवर जोर देत कार्यकारिणीत मोठे बदल केले. या वेळी केवळ पदांचे लेबल लावून फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, आता दिव्यात भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
भाजप(BJP) च्या जिल्हा कार्यकारिणीत बदल केल्यानंतर मंडल अध्यक्षांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या नियुक्त्यांवरून त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्याने आक्षेप नोंदवत शिंदे गटाच्या दबावाखाली भाजपची पक्ष संघटना दिव्यात चालणार असेल, तर कार्यकर्त्यांनी काम कसं करायचं? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
शिवसेना शिंदे गटा(Shinde Group) ने यापूर्वी भाजपचे मंडल अध्यक्ष नीलेश पाटील आणि आदेश भगत यांना पक्षात घेत, दिव्यातील भाजप पक्षाची ताकद खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी भाजपने मंडल अध्यक्षपदाची माळ रोहिदास मुंडे यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर मुंडे यांनी भाजपचा किल्ला लढवत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील पाच वर्षांपासून भाजपचा दिव्यात विरोधक असणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढले.
दिव्यातील पाणी प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राउंड, अनधिकृत बांधकामे आदी मुद्द्यांवरून शिवसेना (Shivsena)शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिंदे गटातील दिव्यातील नेत्यांना मुंडे हे डोकेदुखी ठरू लागले होते. यातूनच दोन महिन्यांपासून दिवा भाजपचा मंडळ अध्यक्ष बदलणार आणि सचिन भोईर यांना मंडळ अध्यक्ष करणार, अशी उघड चर्चा दिवा शिवसेनेचे नेते करत होते.
त्यातच नुकतेच मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीमध्ये शिंदे गटाच्या दिव्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंडल अध्यक्षपदी सचिन भोईर यांची नियुक्ती झाल्याने त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यामुळे भाजपच्या रोहिदास मुंडे यांनी घरचा आहेर देत, शिवसेना शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार दिव्यात भाजप संघटना चालत असल्याचा दावादेखील केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.(Latest Political News)
यापूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरे होते. त्यावेळी संघटनात्मक कोणतीच गोष्टी इतर पक्षापर्यंत पोहोचत नव्हत्या. मात्र, ठाणे जिल्हाध्यक्षपदी संजय वाघुले यांची नियुक्ती झाल्यानंतर असे काय घडले, की पक्षातील अंतर्गत गोष्टी विरोधी पक्षाच्या नेत्यांना कशा माहिती पडतात, असा सवालदेखील रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.