Ahmednagar : नगरमध्ये खासदार सुजय विखे यांच्याकडून विरोधकांवर एकही आरोप - प्रत्यारोपची संधी सोडत नाहीत तर विरोधकही त्यांच्यावर आरोप करत टीका करीत असतात. त्यामुळेच नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला खासदार होऊन अवघी चार वर्षे झाली आहेत.
उत्तर नगर जिल्ह्यात साखर वाटून दिवाळी गोड केली तर अनेकांची अडचण झाली. मात्र, गेल्या तीस वर्षांत दिवाळी कोठे होती ? 20-20 वर्षे नगरसेवक व आमदारांनी कधी दिवाळी केली का ? त्यांच्या तीस वर्षाच्या हिशोब त्यांनी आधी द्यावा, असे आवाहन भाजपचे नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. दरम्यान, फराळ वाटून माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक हलवाई हा आमदार झाला असता, असा सूचक टोला त्यांनी लगावला.
नगर-कल्याण महामार्गावरील नेप्ती चौकातील सीना नदीवर 27 कोटी रुपये खर्चून नवा पूल उभारला जात आहे. त्याचे भूमिपूजन खासदार डॉ. विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी ठाकरे सेनेचे युवा सेना पदाधिकारी विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, प्रा. राम शिंदे (Ram shinde ) यांच्यासह अनेक छोटे- मोठे फराळाचे कार्यक्रम झाले. सुमारे दहा फराळाचे कार्यक्रम या काळात झाले, परंतु शुक्रवारी मी वाढदिवसानिमित्त 'तिखट' खायला ठेवले आहे. त्यावेळी दहा फराळाला गेलेले प्रत्येक जण तेथे येणार आहे आणि फराळाने जर माणूस मोठा झाला असता तर प्रत्येक आमदार हा हलवाईच झाला असता, असा उपरोधिक घणाघात त्यांनी केला.
नगरमध्ये बोलणारा एक असतो, पण त्याची स्क्रिप्ट लिहिणारा दुसराच असतो. वाचक वेगळा, लिहिणारा वेगळा, परंतु कोणाच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत, हे मला माहित आहे, असे भाष्य करून खासदार विखे म्हणाले, आरोप - प्रत्यारोप करून जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. ज्या विचारात ते वाढले, त्याला तेच तिलांजली देत आहेत आणि आमच्यावर आरोप करत आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या काळातील जुना हिशोब अगोदर जनतेला द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तीस वर्षात नगरकरांनी खूप काही सोसले आहे. आंदोलने, शिवीगाळ, मनपा आयुक्तावर शाई फेक, उपोषणे असे सारे केले. परंतु विकास काही केला नाही. त्यामुळे विकास या एकमेव मुद्द्यावर पक्षीय जोडे बाजूला ठेवून मी व आमदार जगताप एकत्रित करत असलेले काम अनेकांना आवडत नाही, असा दावाही खासदार विखे यांनी केला. आयुष रुग्णालयात मध्यंतरी कोणीतरी गेले होते. परंतु या रुग्णालयासाठी मी माझी खासदारकी पणाला लावली व 18 महिन्यात काम पूर्ण केले. पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक नियोजनमधून दोन कोटीचा निधी दिल्याने आता फर्निचर काम झाले आहे.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी खासदार डॉ. विखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते जनहित व लोकहिताची कामे करीत आहेत, परंतु ही कामे त्यांनी बाहेर कोठे करू नयेत व आपल्या मतदार संघातच करावीत, असे स्पष्ट करून जगताप म्हणाले, निवडणुकीचा पावसाळा आला की डराव... डराव... करणाऱ्या छत्र्या उगवतात. पण या बेंडकुळ्यांवर औषध फवारणीचे काम आम्ही करू. नेप्ती चौकातील सीना नदी पुलामुळे शिवाजीनगर व नालेगाव परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे. आता सीना नदीच्या खोलीकरण विषय असून त्यात खासदार विखेंनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त एक डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 यादरम्यान दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक घरात दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत. त्याचा तपशील लवकरच जाहीर करणार आहे, असे सांगून खासदार विखे यांनी, ही दुसरी दिवाळी प्रत्येकाने 22 जानेवारीला आपल्या घरात दिवा लावून साजरी करावी, असे आवाहन केले.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.