Navi Mumbai: गणेश नाईकांनी राजकीय सूड उगवला? मंदा म्हात्रेंना मोठा दणका : महापालिकेकडून मतदारसंघातील 107 कोटींचे प्रकल्प रद्द

Ganesh Naik Manda Mhatre Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेने बेलापूर मतदारसंघातील १०७ कोटींहून अधिक किमतीचे क्रीडा संकुल आणि सेवा रस्ता प्रकल्प रद्द केले असून, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Navi Mumbai 107 crore projects cancelled
Ganesh Naik-Manda MhatreSarkarnama
Published on
Updated on

Manda Mhatre constituency projects cancelled: नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत राजकीय संघर्ष आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे बेलापूर मतदारसंघातील तब्बल १०७ कोटींहून अधिक खर्चाचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर रद्द केले आहेत.

वाशी येथील ४५ कोटी ४८ लाखांचे अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि बेलापूर महापालिका मुख्यालय ते एअर इंडिया कॉलनीदरम्यानचा ६१ कोटी ५५ लाखांचा सेवा रस्ता, हे दोन्ही प्रस्ताव बहुमताने फेटाळले. मात्र, यामागे 'ऐरोली विरुद्ध बेलापूर' असा आकस आणि वर्चस्वाचा वाद असल्याची जोरदार चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.

वाशी सेक्टर-१० ए मधील २० हजार ४०० चौ.मी. भूखंडावर जी+२ स्वरूपाचे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवला होता. यामध्ये १०० मीटर ट्रॅक, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि मल्टीस्पोर्ट्स हॉल यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश होता. परंतु, सभागृह नेते सागर नाईक यांनी या प्रस्तावाला कडक विरोध दर्शवला.

नेरूळ आणि वाशी परिमंडळ-१ मध्ये आधीपासूनच क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. याउलट ऐरोली, घणसोली व रबाळे परिमंडळ-२ भागात पालिकेच्या सुविधा नाहीत. अमर्याद निधी नसल्याने निधीचे समान वाटप होणे गरजेचे आहे, अशी भूमिका नाईक यांनी घेतली.

या निर्णयाला शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील आणि नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तीव्र विरोध केला. परंतु, विषय नामंजूर न करता स्थगित ठेवण्याची मागणी प्रशासनाने केली, परंतु सागर नाईक यांच्या सूचनेनुसार झालेल्या मतदानात बहुसंख्येने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. बेलापूर येथे होत असलेल्या सेवा रस्त्यालाही सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. या मार्गावर रस्त्याऐवजी उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली.

Navi Mumbai 107 crore projects cancelled
Uday Samant: गुजरातला जाणारे प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणतोय; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

'रुग्णालया'चे राजकारण?

बेलापूर मतदारसंघातील आम्र मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६१.५५ कोटींचा समांतर सेवा रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पालिकेने आणला होता. मात्र, केवळ एका विशिष्ट भागापुरता रस्ता करण्याऐवजी अपोलो रुग्णालय चौकात उड्डाणपूल उभारण्याचा आग्रह धरत हा प्रस्तावही सर्वानुमते नामंजूर करण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामागे मूळ कारण वाहतूक कोंडी नसून राजकीय सूडबुद्धी असल्याचे बोलले जात आहे. बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून महापालिकेतर्फे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जात आहे.

जेएनपीए ते उरण फाटा दरम्यानचा हा समांतर सेवा रस्ता थेट या रुग्णालयाला जोडला जाणार होता. मात्र, या रुग्णालयाला रस्ता उपलब्ध होऊ नये आणि प्रकल्पाचे श्रेय रोखता यावे, याच अप्रत्यक्ष हेतूने उड्डाणपुलाचे कारण पुढे करत हा सेवा रस्ता रद्द केल्याची चर्चा रंगली आहे.

'आकसापोटी निर्णय': विरोधकांचा थेट आरोप

प्रशासनाने तांत्रिक अभ्यास आणि व्हेईकल डेन्सिटी स्टडी करूनच हे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणले होते. मात्र, सर्व विकासकामे बेलापूर मतदारसंघातच का? असा प्रश्न उपस्थित करत हे प्रस्ताव फेटाळले. नगरसेविका सरोज पाटील व सुरेश कुलकर्णी यांनी, केवळ ऐरोली मतदारसंघाचा विचार करून आणि बेलापूरच्या विकासकामांबद्दल आकस ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत, असा गंभीर आरोप केला. या राजकीय साठमारीत शहराच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि क्रीडा प्रकल्पांचा बळी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Navi Mumbai 107 crore projects cancelled
Manoj Jarange: मनोज जरांगेंचं निर्णायक आंदोलनाच्या दिशेनं पाऊल! उद्या बोलावली महत्वाची बैठक; प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन

नवी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी मात्र राजकीय आकस किंवा वाद असल्याचे आरोप फेटाळे. सेवा रस्ता आणि क्रीडा संकुलाचे प्रस्ताव नामंजूर करण्यामागे राजकीय आकस नाही.

या प्रकल्पांमुळे जनतेला फायदा होणार नव्हता. सेवा रस्त्याऐवजी उड्डाणपूल असावा अशी सर्व नगरसेवकांनी मागणी केली. तर फक्त वाशीत क्रीडा संकुल न करता ऐरोली मतदार संघातही करायला निधी शिल्लक असायला हवा याकरिता हे प्रस्ताव नामंजूर केले. यात कोणतेही राजकारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com