

Pimpri Chinchwad : गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एकापाठोपाठ लाचखोरीचा धडाका सुरुच ठेवला आहे. यावर्षी २१ मार्च रोजी स्थायी समितीची सभा सुरु असतानाच पाणीपुरवठा विभागातील टेंडर लिपिक दिलीप भावसिंग आडे (वय ५१) याला एक लाख रुपयांची लाच घेताना पालिकेत पकडण्यात आले होते. तर बुधवारी(दि.७) उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे (वय ४६) हा उद्यान विभाग कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
पिंपरी महापालिकेत(PCMC) सव्वा वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरु असून या काळातही भ्रष्टाचार बोकाळलेलाच आहे.गेल्या अडीच महिन्यात पालिकेत एसीबीचे दोन ट्रॅप झाले आहेत. त्यातून प्रशासक तथा आयुक्त शेखरसिंह यांना कारभारावर वर्षांनंतरही जम बसवता आला नसल्याचे दिसून आले आहे. त्यांची कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जरब नसल्याचे एसीबीच्या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या मिळकतकर विभागात 'ACB'ची (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कारवाई यापूर्वी झालेली आहे.
नमूद करण्य़ाजोगी बाब म्हणजे महापालिका कर्मचारी,अधिकाऱ्यांना लाच देऊन काम करून घेणारे ठेकेदारच आता लाच मागणारे अधिकारी,कर्मचाऱ्यांना पकडून देत आहेत. १८ ऑगस्ट २०२१ रोजी स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशीच एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समिती सभापती, त्यांचा पीए, दोन लिपीक व शिपाई अशा पाचजणांना अटक झाली होती.
स्थायीतील या लाचखोरीवर पालिकेच्या होर्डिंग्जची कामे घेणाऱ्या एका तरुण शीख ठेकेदारामुळे शिक्कामोर्तब झाले होते. दरम्यान, त्याप्रकरणी निलंबित झालेले लाचखोर पालिका कर्मचारी पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. त्यानंतर यावर्षी २१ मार्चला पाणीपुरवठा विभागात देखभाल, दुरुस्तीचे काम करणाऱ्या दुसऱ्या एका पालिकेच्या तरुण ठेकेदारामुळे दुसरा पालिका कर्मचारी आडे पकडला गेला.
या ३४ वर्षीय ठेकेदाराच्या कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी आडेने एक लाख पाच हजार रुपये लाच(Bribe) मागून तडजोडीनंतर एक लाख रुपये पालिकेत स्वीकारले होते.तर, पालिकेचा तिसरा लाचखोर आणि सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे हा ही पालिकेच्याच तिसऱ्या ठेकेदारामुळे आज पकडला गेला आहे.
त्याने पालिकेच्या उद्यानात तक्रारदार ठेकेदाराने केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती.त्याबाबत तक्रार येताच एसीबीचे पीआय श्रीराम शिंदे,पोलिस नाईक सुनिल सुरडकर,पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे,चालक पांडुरंग माळी या पथकाने एसपी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी ट्रॅप केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.