

IAS Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून राज्यभर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकऱ्या आणि खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, परवाना निलंबित म्हणजे संबंधित आस्थापना कायमस्वरूपी बंद झाली किंवा परवाना रद्द झाला, असा त्याचा अर्थ नसतो, असे FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, पेस्ट कंट्रोल न करणे, अस्वच्छ परिसर, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, आवश्यक नोंदी न ठेवणे किंवा इतर गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित परवानाधारकाविरुद्ध प्रथम परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाते. यानंतर संबंधित व्यावसायिकाला साधारण 15 दिवसांची मुदत दिली जाते.
या कालावधीत स्वच्छता, पेस्ट कंट्रोल, आवश्यक दुरुस्ती आणि इतर त्रुटी दूर करून त्याचा अनुपालन अहवाल FDA कडे सादर करावा लागतो. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित परवानाधारक FDA आयुक्तांकडे अपील करू शकतो. त्यानंतर केवळ कागदपत्रांवर निर्णय घेतला जात नाही, तर FDA अधिकारी संबंधित आस्थापनाची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करून सुधारणा झाल्याची खात्री करतात.
सर्व निकष पूर्ण झाल्यास परवाना पूर्ववत करण्यात येतो. त्यामुळे FDA कडून झालेली परवाना निलंबनाची कारवाई ही अंतिम नसून, नियमांचे पालन करून त्रुटी दूर केल्यास संबंधित आस्थापनेला पुन्हा परवाना मिळू शकतो.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही ही प्रक्रिया स्पष्ट करत सांगितले की, "परवाना निलंबित झाल्यानंतर संबंधित आस्थापनेला त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली जाते. आवश्यक सुधारणा झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी पुन्हा तपासणी करतात. त्यांचा अहवाल आल्यानंतरच परवाना पूर्ववत करायचा की पुढील कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जातो."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.