Mumbai News, 08 Apr : राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च) चौथे वर्ष लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाला महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील एक नवे आणि क्रांतिकारी पाऊल असल्याचं म्हटलं आहे. पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) ची प्रभावी अंमलबजावणी करताना आपण एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील विद्यापीठांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (Honours & Honours with Research) चौथे वर्ष लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी संशोधनाभिमुख आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.”
या निर्णयासोबतच राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकता, बहुपर्यायी प्रवेश व निर्गमन व्यवस्था, तसेच कौशल्याधिष्ठित व संशोधनाभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली आहे.
याअंतर्गत तीन व चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी क्रेडिट फ्रेमवर्क निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष (ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च) लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्न/स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची सुसूत्र, प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करणे आवश्यक ठरणार आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) यांनी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ती सर्व कुलगुरू व प्र-कुलगुरूंना पाठवली आहेत. त्यांच्या सूचनांचा विचार करून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष लागू करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.