Pune News : राज्य सरकारने सादर केलेल्या बजेटनंतर आता पुणे महापालिकेला आपल्या बजेटची आठवण झाली आहे. मार्च महिन्याच्या सात तारखेला महापालिकेने चालू आर्थिक वर्षाचे (2024-25) बजेट सादर करण्याचा मुहूर्त काढला आहे. यंदाचे पालिकेचे बजेट दहा हजार कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता असून राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे - फडणवीस - पवार सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीची तरतूद या बजेटमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेचे बजेट कधी सादर केले जाणार याबाबत विचारणा केली जात आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यामागे असलेल्या कामाच्या व्यापामुळे यंदाच्या वर्षी बजेट लांबल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत सुरू आहे. मात्र आता पालिकेच्या बजेटला मुहूर्त सापडला असून सात मार्चला हे बजेट सादर करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे आपले बजेट स्थायी समिती समोर सादर करणार आहे. पुणे महापालिकेत (PMC) सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने पालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या वर्षी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 9592 कोटीचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ होऊन पालिकेचे बजेट दहा हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पालिका आयुक्तांनी 15 जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर बजेट (Bugdet 2024) मांडणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपल्याने सर्व कारभार हा पालिका आयुक्तांच्या हातात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून महापालिकेच्या मुख्य सभेच्या ठरावाला बगल देत आयुक्त आपल्या पद्धतीने मार्च महिन्यामध्येच बजेट सादर करत आहेत. यंदाच्या वर्षी देखील हीच परंपरा कायम राहणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने महापालिकेने बजेट सादर करण्यासाठी सात मार्च ही तारीख निश्चित केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी स्थायी समिती समोर मांडला आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे.
या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी केंद्र आणि राज्यांच्या विविध योजनांसाठी महापालिकेच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. राज्य आणि केंद्राच्या विविध योजनांची छाप महापालिकेच्या बजेटमध्ये दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.