
Indapur, 18 May : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजकारणातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. दोघेही एकमेकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेत असतात. अजित पवार यांनी इंदापूरच्या राजकारणात कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांना बळ देत हर्षवर्धन पाटील यांची कायमच कोंडी केली आहे. मात्र, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदानाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते समोरासमोर आले आणि दोघांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगला. त्यात उपस्थित सहकारी आकंठ बुडाले.
इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी आज (ता. 18 मे) मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनेल निवडणूक लढवत आहेत. त्याला छत्रपती बचाव पॅनेलने आव्हान दिले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच माजी आमदार राजेंद्र घोलप यांचे नातू करण घोलप, काही माजी संचालक रिंगणात उतरल्याने छत्रपतीची निवडणूक रंगतदार झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कुटुंबीयांनी भवानीनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये खासदार सुनेत्रा पवार, आशाताई पवार, तसेच अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी मतदान केले.
माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हेही त्याचवेळी मतदानासाठी आले होते. अजित पवार यांनी मतदान करून मतपत्रिका पेटीत टाकण्यासाठी आले. त्याचवेळी हर्षवर्धन पाटील हे मतदान खोलीत दाखल झाले आणि दोघांमध्ये हास्यविनोद रंगला. तो पुढीलप्रमाणे
अजित पवार : नमस्ते...हर्षवर्धन पाटील साहेब... लक्ष राहूद्या आमच्यावर!
हर्षवर्धन पाटील : चांगलं ठेवलंय की...
अजित पवार : झालं का मतदान....?
हर्षवर्धन पाटील : नाही. आताच आलो आहे...!
अजित पवार : आम्ही पाच संस्थेवर आहोत, हे मला माहितीच नाही.
हर्षवर्धन पाटील : (अजित पवार मतपत्रिका पेटीत टाकत असताना) शिक्के नीट मारले का.?
अजित पवार : मारले.... मारले.....
हर्षवर्धन पाटील : चुकलं नाही ना काय?
अजित पवार : दाखवू का तुम्हाला.... (या वेळी दोघांमध्ये प्रचंड हशा पिकतो)
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील हास्यविनोद पाहून उपस्थित कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.