Maharashtra Politics: लोकसभेत जरांगे 'फॅक्टर'नं महायुतीच्या स्वप्नांना मोठा तडा बसला. '45 पार'चे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले. यातच मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरविण्याचे संकेत दिले आहेत.
लोकसभेचा अनुभव लक्षात घेता अनेक नेते जरांगे-पाटील यांची जालन्यातील आंतरवाली-सराटी येथे भेट घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली आहे.
जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार अनेकांनी जरांगे-पाटलांची भेट घेतली होती. त्यात भाजपसह महायुतीतील अनेक नेत्यांचा समावेश आहे. यातच आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी गुरूवारी जरांगे-पाटील यांची भेट घेतली आहे.
आमदार बबनदादा ( Babandada Shinde ) यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या आमदार बबनदादा आणि रणजितसिंह शिंदे यांनी मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांची भेट घेतली होती.
रणजितसिंह शिंदे हे अपक्ष किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीकडून लढू शकतात, असं बोललं जात आहे. यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतल्याचं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
रणजितसिंह शिंदे आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, या भेटीनं माढ्यासह सोलापुरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभेला माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटलांना लीड
बबनदादा शिंदे हे 35 वर्षांपासून माढ्याचे आमदार आहेत. 2019 मध्ये 65 हजारांच्या मताधिक्यानं आमदार बबनदादा शिंदे यांनी विजय मिळवला होता. बबनदादा शिंदे यांना 1 लाख 42 हजार 573 तर शिवसेनेचे संजय कोकाटे यांना 74 हजार 328 मते मिळाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढा विधानसभा मतदारसंघातून 52 हजार 515 मतांचं लीड आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांना 1 लाख 22 हजार 570 मते तर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना 70 हजार मते मिळाली आहेत.
धैर्यशील मोहिते-पाटलांना मिळालेलं मताधिक्य हे आमदार बबनदादा शिंदे यांचं 'टेन्शन' वाढवणारे आहे. मात्र, आमदार बबनदादा हे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. त्यादृष्टीनं रणजितसिंह शिंदे हे 'अॅक्टिव' झाले असून मतदारसंघात भेटी गाठी घेत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच रणतजितसिंह शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.